रिक्त खुर्ची, वाढलेली उत्सुकता
रत्नागिरी पंचायत समिती ; ६४ वर्षांत ३० सभापती, सहा दशकात अनेक स्थित्यंतरे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. नव्या सदस्यांची आणि सभापतींची आस या खुर्चीला लागली आहे. रत्नागिरी पंचायत समितीने सहा दशकांमध्ये अनेक राजकीय चढउतार, स्थित्यंतरे पाहिली. गेल्या ६४ वर्षांमध्ये ३० सभापती पाहणाऱ्या रत्नागिरी पंचायत समितीवर नवा सभापती कोण, याकडे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी पंचायत समितीच्या गेल्या ६४ वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर सभापतिपदाचा हा फलक अनेक राजकीय स्थित्यंतरांची साक्ष देतो. १९६२ मध्ये पहिली पंचायत समिती अस्तित्वात आली. स्थापनेनंतर सुरुवातीची दोन दशके ठराविक नावांचेच वर्चस्व होते. गणपत सीताराम उर्फ दादा सुर्वे आणि मनोहर सखाराम साळवी यांनी आलटूनपालटून या पदाची धुरा सांभाळली. सुर्वे यांनी १९६२ ते ६७ आणि पुन्हा १९७२ ते ७८ असे प्रदीर्घ काळ नेतृत्व केले. हा काळ राजकारणात पायाभरणीचा मानला जातो. त्यानंतर सुर्वे यांनी पुढे आमदारकी निवडणूक लढवली. १९८१ ते ९२ या १०-११ वर्षांच्या काळात पंचायत समितीवर प्रशासकीय कारभार होता. त्यानंतर १९९२ पासून पुन्हा लोकशाही प्रक्रियेने वेग घेतला. सुहास वामन उर्फ कुमार शेट्ये यांनी १९९२ ते ९७ या ५ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला, जो त्यानंतरच्या काळात क्वचित पाहायला मिळाला. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. तरीही त्याच पक्षाचे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्याशी त्यांचे तीव्र मतभेद होते. जिल्हा परिषदेने एकदा रत्नागिरी पंचायत समितीची तपासणी लावली होती. राजकीय शहकाटशहाचा भाग म्हणून त्याकडे पाहिले गेले. पुढे कुमार शेट्ये यांनी विधानसभेची दोनवेळा निवडणूक लढवली. २०१० नंतर समाभपतीपदाचा कार्यकाळ विभागून घेण्याच्या राजकीय तडजोडी वाढल्या. सव्वासव्वा वर्ष कार्यकाळ देण्याचे सेना, भाजप युतीने ठरवले. अनेकजणांना केवळ काही महिन्यांचा कालावधी मिळाला तसेच, योगेश पाटील, सुनील नायते, दत्तात्रय मयेकरसारख्या नेत्यांनी प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली. मार्च २०२१ पासून संजना माने यांच्यानंतर हा फलक अद्याप रिक्त आहे. या निवडणुकीनंतर या बोर्डावर नवीन नाव लिहिले जाणार आहे.
-----
वृषाली नार्वेकर पहिल्या सभापती
१९९०च्या दशकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसले. काँग्रेसचा प्रभाव कमी होऊन सेना-भाजप युतीचा प्रभाव होता तेव्हा भाजपच्या पहिल्या सभापती वृषाली नार्वेकर (१९९८) या पहिल्या महिला सभापती ठरल्या. त्यानंतर ज्योती आरेकर, देवयानी झापडेकर, साधना साळवी, स्वप्नाली सावंत, अनुष्का खेडेकर आणि अलीकडच्या काळातील मेघना पाष्टे, विभांजली पाटील, प्राजक्ता पाटील व संजना माने यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.