swt47.jpg
22053
सिंधुदुर्गनगरी : पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे. सोबत जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत.
निवडणुकीसाठी ५,३८० कर्मचारी सज्ज
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती ः बिनविरोधमुळे ६० मतदान केंद्र घटली
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः बिनविरोध जागांमुळे जिल्ह्यातील ६० मतदान केंद्र घटली आहेत. यामुळे ८१० केंद्रांसाठी ५ हजार ३८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे दिली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (ता. ७) होत आहे. याच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी धोडमिसे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात आठ जिल्हा परिषद गट आणि १७ पंचायत समिती गण सदस्य बिनविरोध निवड झाल्याने प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या केंद्रांत ६० संख्येने घट झाली आहे. ८१० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच ३८ हजार ४५९ मतदार संख्या कमी झाली आहे. पाच लाख ६१ हजार १०५ मतदार ११५ जिल्हा परिषद सदस्य उमेदवार आणि २४४ पंचायत समिती सदस्य उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आता ५० पैकी ४२ जिल्हा परिषद गटासाठी आणि १०० पैकी ८३ पंचायत समिती गणासाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. शनिवारी (ता. ७) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी आता ५ लाख ६१ हजार १०५ मतदार निश्चित झाले आहेत. त्यात २ लाख ८२ हजार ५८८ महिला आणि २ लाख ७८ हजार ५१६ पुरुष आणि इतर एक अशा मतदारांचा समावेश आहे.’’
त्या म्हणाल्या, ‘‘निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी ५ हजार ३८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात क्षेत्रीय दंडाधिकारी १३४, केंद्राध्यक्ष ८९१, मतदान अधिकारी एक नंबर ८९१, मतदान अधिकारी दोन नंबर ८९१ आणि मतदान अधिकारी तीन नंबर ८९१ असा समावेश आहे. याचबरोबर शिपाई ८७२ नियुक्त करण्यात आले आहेत. व्यवस्थापक ८१० नियुक्त केले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची आवश्यक प्रशिक्षणे घेण्यात आलेली आहेत. तिसरे प्रशिक्षण शुक्रवारी (ता. ६) होणार आहे.’’
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात १० हजार ८४७ नावे दुबार असल्याचे उघड झाले होते; परंतु हा आकडा नाम साधर्म्य असल्याने फुगला होता. कारण यातील केवळ ७२९ मतदार दुबार असल्याने पुढे आले आहे. १० हजार ८४७ मतदारांतील १०७२ मतदारांना संपर्क होऊ शकलेला नाही. यात ३३६ मतदार मयत आढळले आहेत, तर नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव अशी तिन्ही नावे सारखीच असलेले तब्बल ८ हजार ७१० मतदार असल्याचे यात आढळले आहेत. नाम साधर्म्य असलेल्या या मतदारांकडून कोणत्या केंद्रावर मतदान करणार, याबाबत त्यांच्याकडून लेखी घेण्यात आले आहे.’’
चौकट
मतदान युनिटही सज्ज
जिल्ह्यात ८१० मतदान केंद्र निश्चित झाली आहेत. यासाठी ८१० कंट्रोल युनिट आणि ८१० बॅलेट युनिट सज्ज ठेवली आहेत. याशिवाय ४६० कंट्रोल युनिट आणि ११६२ बॅलेट युनिट राखीव ठेवली आहेत. सोमवारी (ता. ९) मतमोजणी होणार आहे. यासाठी १० ते १४ मतमोजणी टेबल निश्चित केली आहेत, असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोट
जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वतंत्र तयार निवारण समिती गठित केली आहे. आतापर्यंत एकही तक्रार दाखल झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणी नेटवर्क सुविधा नाही, अशी जिल्ह्यात ७० मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ सखी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देवगड वगळता उर्वरित सात तालुक्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे सात आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
- तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.