मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी मतदान केंद्रात मोबाईल फोन, कॅमेरा व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर सक्त निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली आहे.
निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष व तेथील नियुक्त कर्मचारी व पोलीस यांच्याव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल फोन, कॅमेरा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची परवानगी राहणार नाही. सर्व मतदार तसेच मतदान प्रतिनिधींनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्राच्या बाहेर ठेवणे बंधनकारक राहणार आहे. मतदान केंद्राच्या आत फोटो काढणे, व्हिडिओ शुटिंग करणे किंवा सोशल मीडियावर मतदानाशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारित करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.