-rat९p१९.jpg-
२६O२३१७०
चिपळूण ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणारे कार्यकर्ते.
-----
चिपळुणात उत्साह, तणाव अन् जल्लोष
गुलालाची उधळण, ढोलताशांचा गजर ; माजी सभापती, सदस्यांना पराभवाचा धक्का
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ : उमेदवार आणि कार्यकर्त्यांची फेरीगणिक वाढणारी धाकधूक अन् त्यांच्या चेहऱ्यावरील बदलणारे हावभाव, कुठे वाढलेल्या मतांचा उत्साह तर कुठे पिछाडीवर पडल्यामुळे हिरमुसलेले चेहरे, पराभवाची चाहूल लागताच मतमोजणी केंद्राबाहेर पडणारे उमेदवार, विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांकडून होणारा जल्लोष, घोषणाबाजी अन् गुलालाची उधळण असे वातावरण चिपळुणातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या सभागृहाबाहेर दिसून आले.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती; मात्र त्यानंतर वनविभाग कार्यालय परिसर, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि स्वामी मठ परिसरात विविध पक्षांचे कार्यकर्ते जमा झाले. मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. उमेदवार व कार्यकर्त्यांना मोबाईल नेण्यास मनाई असल्याने आतल्या घडामोडी बाहेर उभ्या असलेल्यांना समजत नव्हत्या; मात्र प्रत्येक फेरीनंतर ध्वनीक्षेपकावर जाहीर होणाऱ्या मतसंख्येनंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत होता. एकूण १६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. पाचव्या फेरीनंतर पिछाडीवर पडलेले काही उमेदवार नाराज होऊन मतमोजणी केंद्राबाहेर पडले. माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण, चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश खापले आणि धनश्री शिंदे यांचा पराभव झाला.
दुपारी तीननंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार होते; मात्र विजय निश्चित होताच अनेक उमेदवार गुलालाची उधळण करत मतमोजणी केंद्रात दाखल झाले. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे, भाजपचे तालुकाप्रमुख विनोद भुरण, शरद शिगवण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणी केंद्राबाहेर ढोलताशे, घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. प्रशासनाने सुविधा उपलब्ध केल्याचा दावा केला असला तरी मतमोजणी केंद्रातील कर्मचारी, उमेदवार आणि उपस्थितांची गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले.
--------
चौकट
पोफळी गणात शेवटपर्यंत उत्कंठा
पोफळी पंचायत समिती गणाची मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत उत्सुकता वाढवणारी ठरली. या गणातील युती आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शेवटपर्यंत मतमोजणी केंद्राबाहेर जमलेले होते. पोफळी पंचायत समिती गणाची मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची ठरली. त्यामुळे युती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिवसभर मतमोजणी केंद्राबाहेर ठाण मांडून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.