वायूगळती प्रकरणी
ड्रग्ज कारखान्यावर गुन्हा
तारापूर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज लिमिटेड कारखान्यामधून वायू गळतीची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी कारखाना व्यवस्थापनाविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी (ता. ९) सायंकाळी प्लॉट क्रमांक टी १५० येथील आरती ड्रग्ज लिमिटेड या रासायनिक कारखान्यातून वायू गळतीमुळे धूर निर्माण होऊन सालवड शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास झाला. नागरिकांनी मोकळ्या जागी धाव घेतली. कारखान्याच्या उत्पादन विभागात पराटोलीन सल्फोनील क्लोराईडचे उत्पादन सुरू असताना क्लोरोसल्फोनेशन प्रक्रियेतून हायड्रोक्लोरिक आम्ल टाकीमध्ये साठवीत त्याची टाकीतून गळती होऊन बाहेरील हवेशी संपर्क झाल्याने धूर निर्माण होऊन बाहेर पसरला. सुरक्षा अभियंत्यांनी आवश्यक उपाययोजना आखून गळतीवर नियंत्रण मिळवल्याने अनर्थ टळला. मात्र, कारखान्यालगतच्या संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना घेराओ घातला. वारंवार होणाऱ्या गळतीविरोधात चौकशी करून कारवाईची मागणी केली. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी आरती ड्रग्ज कारखान्याच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.