पाली, ता. 30 (वार्ताहर) : माणगाव तालक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व पुण्याच्या सीमेवर असलेला ताम्हीणी घाट आदी परिसरात निसर्गाचा अमुल्य ठेवा दडला आहे. येथील अद्वितीय देवकुंड, रोमहर्षक खजिना व आधारबन ट्रेक, समृद्ध निसर्ग व फेसाळणाऱ्या धबधब्यांनी वेढलेला ताम्हिणी घाट व व्हाईट वाॅटर रिव्हर राफ्टिंग पावसाळी पर्यटनासाठी जणू पर्वणीच आहे. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य जणू स्वर्गच भासतो. देशभरातील असंख्य पर्यटक व ट्रेकर येथे ट्रेकिंग व पावसाळी पर्यटनासाठी येतात.
येथील सह्याद्रीच्या उंच व रांगड्या डोंगर रांगांवरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या याठिकाणी पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. कुंडलिका नदीचे उगम स्थान असलेल्या देवकुंड येथील निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. देवकुंड पर्यंत जाणारा ट्रेक देखील अप्रतिम आहे. उंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचं वातावरण हे सारं अनुभवण्यासारखं असतं. पावसाळ्यात येथील सर्व ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेली आहेत.
माणगाव तालुक्यातील पाटणुस, भिरा, विळे व रवाळजे ही गावे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसले आहे. या गावाच्या अवतीभोवती सह्याद्रीच्या अजस्त्र पर्वत रांगा उभ्या आहेत. या सर्व गावांत व आसपासच्या परिसरात नैसर्गिक जैवविविधता प्रचंड प्रमाणात आहे. त्याच बरोबर सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरून फेसळणारे पांढरे शुभ्र धबधबे सरळ खाली येऊन याच ठिकाणावरून पुढे नदी रुपात अरबी समुद्रकडे आगेकूच करतात.
भिरा येथील देवकुंड हे येथील सर्वात प्रसिद्ध व विलोभनिय ठिकाण आहे. येथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो. 'देवकुंड' हे स्थान झपाट्याने पर्यटनाच्या नकाशावर आले आणि या भागात पर्यटकांची संख्या अगदी लाखोंच्या घरात गेली. काही वेळेला येथे दुर्घटना देखील झाल्या. तसेच खजिना व आधारबन डोंगरावरील ट्रॅक प्रसिद्ध आहे. येथे दुर्मिळ गिधाडांचे वस्तीस्थान आहे. या उंच डोंगरावरुन भि-याचे विस्तीर्ण धरण, सह्याद्रीच्या विलोभनिय डोंगर रांगा, नद्या, फेसाळणारे धबधबे, व आजुबाजुचा आकर्षक परिसर दृष्टिक्षेपात येते.
विळ्यापासून पुण्याकडे जाताना ताम्हिणी घाट सुरू होतो. पावसाळ्यात येथे जणू स्वर्गच भासतो. ठिकठिकाणी पडणारे धबधब्यांवर पर्यटक चिंब भिजतात. घाटातील एका बाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला दरी, पावसाचे खाली आलेले ढग व हिरव्यागार निसर्गाने बहरलेले दृश्य पाहून सारेच आनंदी होतात. रवाळजे येथे असलेले "व्हाईट वाॅटर रिव्हर राफ्टिंग उल्लैखनिय आहे. येथे हजारो पर्यटक रिव्हर राफ्टिंग चा आनंद घेतात.
पावसाळ्यात येथे असंख्य पर्यटक, निसर्गप्रेमी व अभ्यासक भेट देतात. त्यामुळे येथील हाॅटेल व लाॅज व्यावसायिक, दुकानदार यांचा व्यवसाय तेजित आहे. मके, भुईमुगाच्या शेंगावाले, वडे व भजी बनविणारे यांना रोजगार मिळतो. ग्रामपंचायतीला देखिल पर्यटन कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून गावाचा विकास करुन पर्यटकांना योग्य सोयी सुविधा परविता येतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या विभागाला निसर्गाची देणगी लाभली आहे. देवकुंड, ताम्हिणी घाट, आधारबन ट्रेक, सिक्रेट पाईट, रिव्हर रफ्टिंग, खजिना ट्रेक आदीसाठी पर्यटक व निसर्गप्रेमींची प्रचंड गर्दी असते. मुंबई, पुणे व महाराष्ट्राच्या बाहेरुन, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांमुळे स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. येथील अद्वितीय निसर्ग सौदर्य सर्वत्र प्रसिद्ध आहे.
ताम्हिणी घाटात सहकुटुंब पावसाळी पर्यटनासाठी नुकताच गेलो होतो. सध्या येथे पर्यटकांची खूप गर्दी आहे. येथील अप्रतिम निसर्ग व फेसाळणारे धबधबे मन प्रसन्न करून टाकतात. येथे चिंब भिजण्याची मजा काही औरच. पर्यटकांसाठी प्रशासनाने येथे स्वच्छतागृहे व तंबू अशा काही सोयी सुविधा करणे अपेक्षित आहे. तसेच हुल्लडबाज पर्यटकांवर निर्बंध आणावे.
मागील 15 वर्षापासून हा संपुर्ण परिसर पादाक्रांत करत आहे. समाज माध्यमांवर या परिसरामधील पक्षांचे ,निसर्गाचे, फुलांचे फोटो व व्हिडिओ टाकून येथील निसर्ग व पशु पक्षांची माहिती देऊन जनजागृती करतो. तसेच "इनक्रेडिबल कोकण" "ताम्हाणी, विळे, पाटणूस, भिरा" हे फेसबुक पेज तयार केले आहे.
-राम मुंढे, स्थानिक निसर्ग पशुपक्षी अभ्यास शिक्षक, कुंडलिका विद्यालय, पाटणूस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.