राजापूर (रत्नागिरी) : तालुक्यातील गोवळ येथील अमोल आणि मनोज परांजपे या परांजपे बंधूंनी विविध प्रकारची शेती करताना गोवळ येथे अर्जुना नदीच्या किनाऱ्यावर मिरची अन् झेंडूची यशस्वी लागवड केली आहे. शेती हा उत्पन्नाचा शाश्वत स्रोत मानला जात असला तरी, अनेक तरुण ऊन-पावसामध्ये शेतात राबण्याऐवजी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. त्याला छेद देत, गोवळ येथील उच्च शिक्षित परांजपे बंधूंनी नोकरीच्या मागे न धावता अर्थार्जनासाठी शेतीची कास धरीत तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
लहरी पाऊस आणि हवामानामध्ये सातत्याने होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे शेतीमध्ये उत्पन्नापेक्षा जादा खर्च होतो. त्यातून शेती परवडत नसल्याने कोकणातील अनेक तरुण आणि कुटुंबे रोजगारासाठी शेतामध्ये राबण्याऐवजी मुंबई-पुणे आदी मोठी शहरे गाठताना दिसतात. ओसाड शेतीक्षेत्र जास्त दिसत आहे. मात्र, गोवळ येथील बीएस्सी ॲग्रिकल्चर झालेला अमोल आणि एमएस्सी ॲग्रिकल्चर झालेला मनोज या उच्चशिक्षित परांजपे बंधूंनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेतीची कास धरली आहे.
गेली अनेक वर्ष वडील महेश परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतामध्ये राबणाऱ्या या बंधूंनी यावर्षी सुमारे सव्वा एकर क्षेत्रामध्ये मिरची तर अर्धा एकर क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड केली आहे.
शेतीची कामे करण्यासाठी सद्यःस्थितीमध्ये गडी-माणसे उपलब्ध नाहीत. यातून जमाखर्चाचा ताळमेळ बिघडतो. अशा स्थितीमध्ये त्यांनी शेतामध्ये वाढणारे तण कमी होण्यासह पिकातील वाफसा कायम राहावा, यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचन करताना रोपांची चांगली वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळावे, म्हणून जीवामृतासह विविध खतांचा डोसही दिला. प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला असला तरी शेतामध्ये चांगलेच पीक आल्याबद्दल अमोल यांनी समाधान व्यक्त केले.
झेंडूच्या फुलांना मोठी मागणी
शेतामध्ये फुललेल्या झेंडूच्या फुलांसह मिरचीच्या विक्रीसाठी परांजपे बंधूंना अन्य ठिकाणची बाजारपेठ शोधावी लागलेली नाही. स्थानिक बाजारपेठेमध्ये झेंडूच्या फुलांची विक्री झाल्याची माहिती अमोल परांजपे यांनी दिली. त्यामध्ये सुमारे अकराशे किलोची विक्री झाली असून अजून सुमारे पाचशे-सहाशे किलो फुलांची विक्री होण्याचा अंदाज आहे. मिरचीची पावडर करून अन्य ठिकाणी विकण्याऐवजी आपल्याच घरामध्ये वापरासाठी तिचा उपयोग करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.