citizens janakrosh morcha on nagarpanchyat pali for water issue sakal
कोकण

Water Issue : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत पाणीबाणी

वारंवार तुटणाऱ्या जल वाहिन्या, नादुरुस्त मोटार पंप व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

अमित गवळे

पाली - वारंवार तुटणाऱ्या जल वाहिन्या, नादुरुस्त मोटार पंप व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यामुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.12) सततच्या पाणीटंचाईने बेजार झालेल्या संतप्त नागरिकांनी पाली नगरपंचायत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांना घेराव देखील घातला.

यावेळी आलेल्या आंदोलनकर्त्यांना नगराध्यक्ष यांच्या पतीने बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे येथील परिस्थिती अधिक चिघळली आणि आंदोलनकर्त्या नागरिकांनी याबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला.

पालीकरांना अंबा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. अंबा नदी जवळील जॅकवेलमधून पंपाद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून पाली नगरपंचायत हद्दीत पाणीपुरवठा केला जातो. काही ठिकाणी थेट नदीतून पाणी मोटारीने ओढून सोडले जाते. हे मोटार पंप 24 तास चालू असल्याने एखादा पंप नेहमी बिघडतो. अशावेळी पंप दुरुस्तीसाठी काही दिवस जातात आणि काही ठिकाणी पाणी टंचाई येते.

तसेच कमकुवत जलवाहिन्या वारंवार तुटतात परिणामी त्या दुरुस्तीला खूप वेळ जातो आणि त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा खंडित होतो. शिवाय अनेक जलवाहिन्यांना गळती लागल्याने शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सतत तक्रारी करून देखील यावर उपाययोजना होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणी टंचाईने वैतागलेले नागरिक आपली समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात जन आक्रोश मोर्चा घेऊन गेले. मात्र तेथे समस्येचे निराकरण न करता नागरिकांना अयोग्य वागणूक देण्यात आली. तसेच नगराध्यक्ष यांच्या पतीने नागरिकांना बाहेर काढा असे सांगितले. ही बाब अत्यंत चुकीची आहे. या घटनेचा आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध करतो.

- श्रीकांत ठोंबरे, अध्यक्ष, भाजप, सुधागड तालुका

तांत्रिक समस्या असल्याने पालीत पाणी पुरवठा अनियमित आहे. मात्र यावर लवकर तोडगा काढण्यात येईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. मोर्चेकरी नागरिक असभ्य भाषेत बोलून वाद घालत होते. यावेळी तिथे असलेले माझे मित्र सूरज शेळके यांनी मध्ये येऊन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

- सुधीर भालेराव, पाणी पुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

पाणीपुरवठा सभापतींना संतप्त नागरिकांनी घेराव घातला होता. त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. अशावेळी कोणता अनुचित प्रकार घडू नये, वाद वाढू नये व शांतता राहावी यासाठी नागरिकांना बाहेर जाण्यास सांगितले.

- सूरज शेळके, सामाजिक कार्यकर्ते, पाली

पालीतील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल.

- विद्या येरूनकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, पाली

लोकांचे हाल

ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरीकांचे मात्र गैरसोय होत आहे. त्यांना दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. तर कधी विकतचे पाणी आणावे लागते.

वारंवार पाणी टंचाईचे सावट

अंबा नदिजवळील जॅकवेलमध्ये असलेल्या पंपांद्वारे पाणी सरगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते व तेथून सर्व पालीत पाणी पुरवठा केला जातो. तर काही भागात नदीतून थेट पाणी पुरवठा केला जातो.

मात्र जॅकवेल ते साठवण टक्या यांच्या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणाऱ्या लहान, जुन्या व जिर्ण झालेल्या जलवाहिन्या, साठवण टाक्यांची दुरावस्था, सतत बिघडणारे व अपुऱ्या क्षमतेचे पंप, नवीन पुलाचे सुरू असलेले काम, जॅकवेल मध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहिन्या, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाई भेडसावते.

योग्य व्यवस्थापन नसल्याने नळपाणी कर्मचाऱ्यांना वारंवार त्याच त्याच ठिकाणी हकनाक काम करावे लागते. त्यामुळे त्यांचे श्रम व वेळ हकनाक वाया जातो. नळपाणी योजना झाल्यास ही समस्या निकाली निघू शकते.

पालीकर व भाविकांना दूषित पाणी पुरवठा

पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी जाते. शिवाय साठवण टाक्यांमध्ये प्रचंड घाण व चिखल आहे. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पालीत साधारण अडीच हजार नळ कनेक्शन आहेत. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात.

पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

शुद्ध पाणी योजनेचा विसर

शुद्ध पाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. सद्यस्थितीत पालीकरांसाठी जवळपास 27 कोटिंची शुद्ध पाणी पुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

मागील वर्षी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले होते. दीड वर्ष होऊन गेले तरी अजून काहीच झालेले नाही. प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

वाढीव पाणीपट्टीचा भार

पाली नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा साधारण 780 रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT