शीतल भगत यांचे ध्येय
पुणे - बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनमधील भारतीय प्रमुख धावपटू; तसेच हौशी रनर्ससाठी आकर्षण असलेली १० किमी शर्यतही लक्षवेधक ठरली. पुरुषांमध्ये आर्मी स्पोर्टसमधील दुर्गा बहाद्दूर बुद्धा आणि महिलांमध्ये शीतल भगत यांनी पहिला क्रमांक मिळवला. पण, या शर्यतीबरोबर त्यांनी पुढील महिन्यातील मुंबई मॅरेथॉनचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले. या विजेत्यांसह दुसरे आणि तिसरे स्थान मिळवणाऱ्या धावपटूंनीही हाच दृष्टिकोन व्यक्त केला.
सूर्याच्या किरणांप्रमाणे उत्साह वाढू लागलेल्या पुणे अर्धमॅरेथॉनचे यंदाचे दुसरे पर्वही खास ठरले. आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट तसेच महाराष्ट्राच्या मॅरेथॉनमध्ये चमक दाखवणाऱ्या धावपटूंनी आपला अनुभव पणास लावला आणि अनेक हौशी धावपटूंनी त्यांच्याशी स्पर्धा केली. त्यामुळे १० किमी शर्यत आगळावेगळा ठसा उमटवणारी ठरली. जिंकले ते यशवंत ठरले; परंतु शर्यत पूर्ण करणाऱ्या इतरांसाठीदेखील ही शर्यत म्हणजे नवा आत्मविश्वास उंचावणारा अनुभव ठरला.
या शर्यतीस पहाटे सहा वाजता सुरुवात झाली. पण, पुढची चार मिनिटे ‘स्टार्टिंग पॉइंटवर’ धावपटूंची गर्दी कायम होती. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद १० किमी शर्यतीला मिळाला होता. पहाट होत असल्यामुळे रस्त्यांवरची गर्दी वाढत होती. त्यांच्या प्रोत्साहनामुळे धावपटूंच्या पायातला वेग अधिकच वाढत होता. पुरुषांमध्ये दुर्गा बहाद्दूर बुद्धा आणि महिलांमध्ये शीतल भगत यांनी प्रतिस्पर्ध्यांवर सुरुवातापासून मिळवलेली आघाडी शर्यत जिंकेपर्यंत कायम ठेवली.
पुणे मॅरेथॉन ही आमच्यासाठी क्षमतेची चाचणी करून देणारी होती. त्यामुळे आम्ही सर्वस्व पणास लावले होते. येथील अनुभवाच्या जोरावर आता आम्हाला पुढील महिन्यात होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी मारायची आहे, अशी भावना केवळ विजेत्या दुर्गा आणि शीतल यांनीच नव्हे. तर प्रमुख धावपटूंनीही व्यक्त केली. मी वर्षभरानंतर प्रथमच या पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. दुखापतीनंतर आपण किती तंदुरुस्त झालो आहोत आणि पुढील लक्ष्य कोणते ठेवायचे, हे मला जाणून घेता आले, असे मत महिलांमध्ये दुसरे स्थान मिळवणाऱ्या मोनिका आथरेने व्यक्त केले.
या सर्व धावपटूंनी सुविधांचे कौतुक केले. तसेच, वातावरणही आल्हादायक असल्यामुळे धावताना त्रास झाला नाही, अशी भावना व्यक्त केली.
निकाल -
१० किमी पुरुष - १) दुर्गा बहाद्दूर बुद्धा (३०.३५ मि.), २) रॉबिन सिंग (३१.०२ मि.), ३) किसन म्हात्रे (३१.२२)
महिला - १) शीतल भगत (३७.०३ मि.), २) मोनिका आथरे (३७.११ मि.) ३) सायली कोकितकर (३८.५२)
या शर्यतीसाठी मी रोज तीन तास सराव करीत होते. गतवर्षीही पहिला क्रमांक मिळवलेला असल्यामुळे यंदाही यश मिळवण्याचा विश्वास होता. आता मुंबई मॅरेथॉनसाठी प्रयत्न करणार आहे.
- शीतल भगत, १० किमी महिला विजेती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.