Bronze to india wrestling Aman Sehrawat at Olympic games paris Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Wrestling : अमन सेहरावतला ब्राँझ; ऑलिंपिकमध्ये कुस्तीतील पदकांची मालिका कायम

भारताचा पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकावर नाव कोरले. त्याने ५७ किलो वजनीगटात प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूझ याच्यावर १३-५ असा दणदणीत विजय मिळवला आणि भारताला यंदाच्या ऑलिंपिकमधील सहावे पदक मिळवून दिले.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस ­­: भारताचा पुरुष कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकावर नाव कोरले. त्याने ५७ किलो वजनीगटात प्युर्टो रिकोच्या डेरियन क्रूझ याच्यावर १३-५ असा दणदणीत विजय मिळवला आणि भारताला यंदाच्या ऑलिंपिकमधील सहावे पदक मिळवून दिले.

भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत पाच ब्राँझ व एक रौप्य, अशी एकूण सहा पदके पटकावली आहेत, तसेच ऑलिंपिकच्या इतिहासात भारताला कुस्ती खेळामधून आठवे पदक मिळवता आले. भारताची २००८पासून कुस्ती खेळात ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याची मालिका पॅरिसमध्येही कायम राहिली. २००८, २०१२, २०१६, २०२० व २०२४ अशा सलग ऑलिंपिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी पदके पटकावताना ऐतिहासिक यश मिळवले आहे.

अमन सेहरावत याच्या आक्रमक खेळापुढे डेरियन क्रूझ याला चमक दाखवता आली नाही. पहिल्या पीरियडमध्ये अमन याच्याकडे ६-३ अशी आघाडी होती. त्यानंतरच्या पीरियडमध्ये अमनने जबरदस्त खेळ केला. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पायावर आक्रमण करत त्याने सात गुणांची कमाई केली. अखेर अमनने एकतर्फी विजयाला गवसणी घातली.

दरम्यान, याआधी अमनने गुरुवारी पॅरिस ऑलिंपिकला दणक्यात सुरुवात केली. त्याने पहिल्याच फेरीच्या लढतीत नॉर्थ मॅसेडोनिया देशाच्या व्लॅदिमिर इगोरोव याच्यावर १०-० अशी मात करत आश्‍वासक पाऊल टाकले.

अमनच्या आक्रमक खेळापुढे व्लॅदिमिरचा निभाव लागला नाही. त्याने पहिल्याच पीरियडमध्ये सहा गुणांची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या पीरियडमध्येही अमन याच्यासमोर व्लॅदिमिर निष्प्रभ ठरला. भारताच्या पठ्ठ्याने यामध्ये चार गुण कमावले.

अमनने पुढील फेरीत अल्बानियाच्या अबाकारोव झेलिमखान याचा १२-० असा धुव्वा उडवला. या लढतीतही अमनकडून अव्वल दर्जाचा खेळ झाला. त्याने पहिल्या पीरियडमध्ये तीन गुण कमावले; पण त्यानंतर नऊ गुणांची कमाई करताना प्रतिस्पर्ध्याला जवळपास चीतपट केले.

मात्र त्यानंतर अमन सेहरावत-रेई हिगुची यांच्यामध्ये उपांत्य लढत पार पडली. पण ही उपांत्य लढत सहा मिनिटांपर्यंत चाललीच नाही. हिगुची याने अमन याच्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवले. अमनच्या एका पायाची पकड करत हिगुची याने चार गुणांची कमाई केली. यानंतर पहिल्या तीन मिनिटांच्या कालावधीतच प्रत्येकी दोन गुण तीन वेळा त्याने कमावले. तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ कामगिरी करीत हिगुची याने अमनला पराभूत केले.

कोण आहे अमन?

आई-वडिलांचे छत्र लहानपणीच गमावलेल्या अमनचे पालनपोषण त्याचे आजोबा मनगाम सेहरावत यांनी केले. त्यांनीच अमनला घडवले. कुस्तीपटूंची खाण असलेल्या हरियानातील छत्रसाल स्टेडियममधील आखाड्यात सराव करणारा अमन लहानपणापासूनच गुणवान आहे.

२३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय मल्लही ठरलेला आहे. कुस्तीत दोन ऑलिंपिक पदके मिळवणाऱ्या सुशील कुमारपासून स्फूर्ती घेऊन अमनने कुस्तीत आपली कारकीर्द सुरू केली.

सर्वांत लहान पदकविजेता

आतापर्यंत भारताच्या इतिहासातील ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणारा अमन सर्वांत लहान खेळाडू ठरला आहे. त्याचे वय २१ वर्षे २४ दिवस असे आहे.

ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय कुस्तीवीर

  • खाशाबा जाधव (ब्राँझ : १९५२)

  • सुशील कुमार (ब्राँझ : २००८, रौप्य : २०१२)

  • योगेश्‍वर दत्त (ब्राँझ : २०१२)

  • साक्षी मलिक (ब्राँझ : २०१६)

  • रविकुमार दहिया (रौप्य : २०२०)

  • बजरंग पुनिया (ब्राँझ : २०२०)

  • अमन सेहरावत (ब्राँझ : २०२४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT