Team India T20 World Cup 2024 sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Team India T20 World Cup 2024 : सराव सामन्यामधून भारतीय संघाचा गृहपाठ

T20 World Cup 2024 Team India : भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी मध्यरात्री पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यामधून टी-२० विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीसाठीचा गृहपाठ करून घेतला

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

T20 World Cup 2024 Team India : भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी मध्यरात्री पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यामधून टी-२० विश्‍वकरंडकाच्या मुख्य फेरीसाठीचा गृहपाठ करून घेतला. या लढतीत भारताने विजय मिळवला; पण येथील खेळपट्टीवर सहज फलंदाजी करता येणार नाही हे समजले. तसेच शिवम दुबेकडून गोलंदाजी करवून घेत हार्दिक पंड्यासह त्याच्याकडून अष्टपैलू खेळाची अपेक्षा करता येईल, याची चाचपणीही करता आली.

टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाली आणि एकाच दिवशी दोन सामने झाले, ज्यांचे वेगवेगळे पडसाद उमटले. पहिला भारताचा सराव सामना न्यूयॉर्कला झाला आणि दुसरा अमेरिकन संघाचा कॅनडा विरुद्धचा स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना डल्लास गावी झाला. भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा केलेला पराभव औपचारिकता होती; तर अमेरिकन संघाने कॅनडाने उभारलेल्या धावसंख्येचा केलेला वेगवान पाठलाग वेगळीच कहाणी सांगून गेला. केलेल्या गृहपाठातून भारतीय संघाने स्पर्धेची तयारी मनासारखी झाल्याचा संदेश दिला. दुसरीकडे अमेरिकन संघाने सामना जिंकून गुणतक्त्यात पहिले गुण नोंदवताना आमची दखल घ्यावी लागेल, असा गर्भित इशारा जणू काही दिला.

कितीही सराव मन लावून केला तरी खरी शिकवणी सामन्यातून मिळते. भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला ही गोष्ट पक्की माहीत असल्याने भारतीय संघ एकमेव सराव सामन्याकडे गांभीर्याने बघत होता. नासाऊ कौंटी मैदानाचा आणि तिथल्या खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी सराव सामना खूप मोलाचा होता. बाहेर तयार करून मग आत आणून बसलेल्या खेळपट्टीला ड्रॉप इन पिच म्हटले जाते. अशा खेळपट्टीचा नुसता बघून अंदाज लागत नाही. सराव सामन्यात खेळाच्या सुरुवातीला कळून चुकले की फलंदाजाला सहजी फटकेबाजी या खेळपट्टीवर करता येणार नाही. रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने केलेल्या दणकेबाज खेळींमुळे भारतीय संघाला एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ज्या हार्दिक पंड्याला गेले काही महिने क्रिकेटने दूर ढकलले होते त्या हार्दिक पंड्याला त्याच क्रिकेटने अखेर थोडे कडेवर घेतले.

गोलंदाजी करताना भारतीय संघ व्यवस्थापनाला शिवम दुबेला गोलंदाजी करताना बघायचे होते. शिवम दुबेने अपेक्षित मारा करून मधल्या फळीत हार्दिकसोबत अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करायला मी तयार असल्याचा भरवसा दिला. भारतीय गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तोंड देताना बांगलादेशी फलंदाजांची अपेक्षित तारांबळ उडाली.

अमेरिकेला पाठिंबा

पहिल्या सामन्यात कॅनडाच्या फलंदाजांनी नेटाने खेळ करून उभारलेल्या चांगल्या धावसंख्येचा अमेरिकन फलंदाजांनी केलेला वेगवान पाठलाग लगेच चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत क्रिकेटची पाळेमुळे रुजली असल्याची ती निशाणी होती. १९० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना अमेरिकन फलंदाजांनी दाखवलेली चमक बरेच काही सांगून गेली. अमेरिकन संघ भारत आणि पाकिस्तानच्या गटात असल्याचाही मोठा फायदा स्थानिक लोकांमध्ये या खेळाच्या प्रसार व प्रचाराला होणार आहे. कारण या सामन्याला स्थानिक अमेरिकन प्रेक्षक भारत किंवा पाकिस्तानचे मूळचे रहिवासी असल्याने आपापल्या संघाने प्रोत्साहन देताना हळूच अमेरिकन संघालाही आवाजी मतदान करतील, असे पहिल्या सामन्यातील उत्साह बघून वाटत आहे.

न्यूयॉर्क शहराचा आनंद

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ परत एकदा स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्याच्या तयारीला लागणार आहे. भारतीय संघ सराव किंवा सामन्याला जाताना आणि वास्तव्य करत असलेल्या हॉटेलात भरपूर सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. मोकळ्या वेळात मात्र खेळाडू क्रिकेटसोबत न्यूयॉर्क शहराचा आनंद घेत आहेत. रस्त्यावरून चालत जात मोकळ्या रेस्टॉरंटमध्ये बसून कधी कॉफी; तर कधी जेवणाबरोबर स्थानिक निसर्गाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. स्थानिक चाहते खेळाडूंच्या मागावर राहत आपापल्या आवडत्या खेळाडूसोबत एकतरी फोटो काढायचा अशी युक्ती लढवत आहेत. स्थानिक लोकांना त्याचा गंध नसला तरी अनिवासी भारतीयांमध्ये भारतीय खेळाडूंची लोकप्रियता अगदी स्पष्ट कळून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT