Dhoni has batted at Ajni and VNIT grounds
Dhoni has batted at Ajni and VNIT grounds 
क्रीडा

काय सांगता... धोनीचे आंतरराष्ट्रीय ‘टेक ऑफ' नागपुरातूनच!

नरेंद्र चोरे

नागपूर : देशाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी मिळवून देणारा व क्रिकेट जगतात ‘कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे आंतरराष्ट्रीय ‘टेक ऑफ' नागपुरातून झाले होते, हे बहुधा अनेकांना माहिती नसावे. पण, हे खरे आहे. धोनीने सोळा वर्षांपूर्वी नागपुरातील एका स्पर्धेत केलेल्या जबरदस्त फटकेबाजीमुळेच त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली होती. ती स्पर्धा धोनीसाठी ‘लकी' ठरली होती. स्वतः धोनीही ही बाब मान्य करतो.

माही दक्षिणपूर्व रेल्वेत तिकीट कलेक्टर असताना एप्रिल २००४ मध्ये नागपुरात ४९ वी अखिल भारतीय आंतररेल्वे क्रिकेट स्पर्धा खेळली गेली होती. सामने अजनी व व्हीएनआयटी मैदानावर झाले होते. लांबसडक केसांचा धोनी त्या काळात फारसा नावाजलेला नव्हता. त्यामुळे नागपुरातही त्याला कुणी ओळखत नव्हते. मात्र, धोनीने त्या स्पर्धेत तुफान फटकेबाजी करून केवळ नागपूरकर क्रिकेटप्रेमींचे मनच जिंकले नाही तर त्याचे भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्नही साकार झाले होते.

दक्षिणपूर्व रेल्वेकडून खेळताना कर्णधार धोनीने त्या स्पर्धेत दोन तडाखेबंद शतके (१४८ व १२४ धावा) ठोकली होती. मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर पूर्व मध्य रेल्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने अवघ्या ५६ चेंडूंत नाबाद १४८ धावांचा पाऊस पाडत आपल्या संघाला दहा गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला होता. या धुवाधार खेळीत त्याने १९ चौकार आणि ११ गगनचुंबी षटकार ठोकले होते. उल्लेखनीय म्हणजे, यातील काही षटकार आजूबाजूच्या घरांवर जाऊन आदळले होते.

त्यानंतर धोनीने नॉर्थ फ्रंटियर संघाविरुद्धही २० चौकार व ४ षटकारांसह ५६ चेंडूंत १२४ धावा ठोकल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली होती. त्यावेळी धोनीचा संघ आमदार निवासात थांबला होता. शतकानंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आपले नाव आले नाही तरी चालेल, पण तो वापरत असलेल्या बास कंपनीचा फोटो अवश्य आला पाहिजे, असा धोनीने त्यावेळी स्थानिक क्रीडा वार्ताहरांकडे आग्रह धरला होता. त्याने ‘सकाळ'च्या फोटोग्राफरकडून बॅटसह सात फोटोही काढून घेतले होते.

शानदार कामगिरीनंतरही धोनीचा संघ विजेतेपद मिळवू शकला नसला तरी, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला नक्कीच नवे वळण दिले. कारण, येथूनच धोनीचे नशीब फळफळून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. नागपुरातील स्पर्धेनंतर काही दिवसांनी झिम्बाब्वे व केनिया दौऱ्यासाठी भारत ‘अ' संघाची घोषणा करण्यात आली. नागपुरातील कामगिरीच्या बळावर धोनीची संघात निवड करण्यात आली.

धोनीला ही गोड बातमी कळली, तेव्हा तो सिंगापूर येथील सुपर सिक्स स्पर्धेत खेळत होता. धोनीने याही स्पर्धेत दोन शतके ठोकून टीम इंडियाचा कर्णधार सौरव गांगुली व रवी शास्त्री यांचे लक्ष वेधले. लगेच डिसेंबर महिन्यात झालेल्या बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला भारतीय वनडे संघात प्रथमच संधी देण्यात आली. त्यानंतर मात्र माहीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

व्हीसीएवरही सोडली छाप

आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या निमित्ताने धोनी अनेकवेळा नागपुरात आला होता. दोन शतके व पाच अर्धशतके झळकावून त्याने आपली छाप सोडली होती. सिव्हिल लाइन्स मैदानावर तो इंग्लंडविरुद्ध एक कसोटी आणि श्रीलंका, वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे खेळला होता. जामठा स्टेडियमवर तो चार कसोटी, सहा वनडे आणि तीन टी-२० सामने खेळला. कसोटीत त्याने दोन शतके नोंदविली तसेच दोनवेळा शंभरीत बाद झाला. याशिवाय तो सिव्हिल लाइन्सवर झारखंडकडूनही एक रणजी सामना खेळला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT