morgan
morgan 
क्रीडा

World Cup 2019 : इंग्लंडकडून अफगाणिस्तानची धुळधाण 

सकाळ वृत्तसेवा

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : यजमान इंग्लंडने मायदेशातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडत अफगाणिस्तानची धुळधाण उडविली. इंग्लंडने 150 धावांनी दणदणीत विजय संपादन केला. 

कर्णधार मॉर्गनने पुढाकार घेत अफगाण गोलंदाजीची दाणादाण उडविली. 398 धावांच्या आव्हानासमोर अफगाणिस्तानला 8 बाद 247 इतकीच मजल मारता आली. 50 षटके तग धरणे आणि स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविणे इतकेच अफगाण संघासाठी दिलासा देणारे ठरले. 

आर्चरचा दणका 
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने इंग्लंडला पहिले यश मिळवून देण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. डावाच्या दुसऱ्या व वैयक्तिक पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने नूर अली झाद्रान याची शून्यावर दांडी गुल केली. त्यानंतर अफगाणिस्तानने छोट्या-छोट्या भागिदाऱ्या रचल्या, पण इंग्लंडने त्या धोकादायक ठरण्याआधीच फोडल्या. मुख्य म्हणजे कोणत्याही टप्यास आवश्‍यक धावगतीच्या आसपासही अफगाण संघ नव्हता. 
सलामीला बढती घेतलेला कर्णधार गुलबदीन याला अर्धशतक फलकावर लागल्यानंतर वूडने टिपले. शतक फलकावर लागल्यानंतर रहमतचा अडसर रशीदने दूर केला. शाहिदी आणि माजी कर्णधार असगर यांनी 94 धावांची भागीदारी रचली. रशीदने ही जोडी फोडली. शाहिदीचा त्रिफळा आर्चरने उडविला. आर्चर आणि रशीद यांनी प्रत्येकी तीन विकेट टिपल्या. 

तत्पूर्वी, चौकारांपेक्षा षटकारांची अधिक बरसात झालेल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पुरती धुलाई केली व या स्पर्धेत सर्वाधिक 6 बाद 397 धावांचा हिमालय त्यांनी उभा केला. इंग्लंड कर्णधार इऑन मॉर्गनने तुफानी शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम केला. 

दोन दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सामना झालेल्या मॅंचेस्टरच्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचे पुरते तीन तेरा वाजवले या दरम्यान अनेक विक्रमही मोडले गेले. हताश झालेल्या अफगाण गोलंदाजांना पळता भूई थोडी झाली. 21 चौकार आणि 25 षटकांचे तुफान मॅंचेस्टरच्या मैदानावर आले. यातील 17 षटकार एकट्या मॉर्नगनने मारले. 

मॉर्गनला 28 धावांवर जीवदान मिळाले होते. त्यानंतर त्याने पुढील 120 धावा अवघ्या 45 चेंडूत झळकावल्या. इंग्लंडने अखेरच्या 10 षटकांत तब्बल 142 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये सर्वात भेदक गोलंदाज म्हणून लौकिक मिळवणारा लेगस्पिनर रशिद खान विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने आपल्या 9 षटकांत 110 धावा दिल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम 113 चा आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संभाव्य विजेते म्हणून पसंती मिळत असलेल्या इंग्लंडने वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता त्यांच्या सर्व सामन्यांत तीनशे धावांच्या पलीकडे मजल मारली. आज तर 400 धावांचा टप्पा तीन धावांनी अपुरा राहिला. (वेस्ट इंडीजला 212 धावांत गुंडाळले होते, त्यामुळे त्यांना तीनशे धावांची संधी मिळाली नव्हती). 

फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. बांगलादेशची गोलंदाजी अगोदरच दुबळी आहे त्यात त्यांनी क्षेत्ररक्षणातही चुका केल्या. मैदानी क्षेत्ररक्षणाबरोबर त्यांनी झेलही सोडले आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. बेअरस्टॉ (90) आणि ज्यो रूट (88) यांची शतके हुकली, पण मॉर्गनने मैदानात आल्या आल्या तुफानी टोलेबाजी सुरू केली. 71 चेंडूतील 148 धावांपैकी 118 धावा त्याने चौकार आणि षटकारांनीच पूर्ण केल्या. 

मॉर्गनचा हा झंझावात 47 व्या षटकांत थांबला तोपर्यंत हतबल झालेल्या अफगाण गोलंदाजांतील दलवत झद्रानने जॉस बटलर आणि बेन स्टोक्‍स या धडाकेबाज फलंदाजांनी झटपट बाद केले खरे; परंतु मोईन खानने तब्बल 345 च्या स्ट्राईक रेटने नऊ चेंडूतच नाबाद 31 धावा झळकावल्या. 

संक्षिप्त धावफलक : 
इंग्लंड 50 षटकांत 6 बाद 397 (जॉनी बेअरस्टॉ 90 -99 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार, ज्यो रूट 88 -82 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, इयॉन मॉर्गन 148 -71 चेंडू, 4 चौकार, 17 षटकार, मोईन अली नाबाद 31 -9 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, दलवत झद्रान 10-0-85-3, गुलबदीन नबी 10-0-68-3, रशिद खान 9-0-110-0) विजयी विरुद्ध अफगाणिस्तान ः 50 षटकांत 8 बाद 247 (गुलबदीन नईब 37-28 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, रहमत शाह 46-74 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, हश्‍मतुल्ला शाहिदी 76-100 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, असगर अफगाण 44-48 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, महंमद नबी 9, नजीबउल्लाह झाद्रान 15,जोफ्रा आर्चर 10-1-52-3, मार्क वूड 10-1-40-2, आदिल रशीद 10-0-66-3) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT