Ronaldo 
क्रीडा

रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने रेयालची मुसंडी 

वृत्तसंस्था

माद्रिद : 'सुपरस्टार' ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर गतविजेत्या रेयाल माद्रिदने बायर्न म्युनिकला अतिरिक्त वेळेत हरवून चॅंपियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारली. रोनाल्डोचा एक गोल ऑफसाइड ठरल्याची दाट शक्‍यता होती, तसेच आर्तुरो विडाल याला दुसरे यलो कार्ड मिळणेसुद्धा बायर्नसाठी कठोर ठरले. त्यामुळे या लढतीला वादाचे गालबोट लागले. रोनाल्डोने चॅंपियन्स लीगमध्ये शंभर गोलांचा टप्पा धडाक्‍यात गाठला. 

युरोपमधील या दोन मातब्बर क्‍लबमधील लढत अपेक्षेनुसार चुरशीची झाली. एकूण सहा गोलची नोंद होणे रोमहर्षक ठरले, पण पंचांचे दोन निर्णय वादग्रस्त ठरले. हंगेरीचे पंच व्हिक्‍टर कासाई आणि त्यांच्या सहायकांवर त्यामुळे टीका झाली. 

पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर 1-2 असे पराभूत झाल्यामुळे बायर्नला किमान दोन गोलांच्या फरकाने विजय मिळविणे अटळ होते. त्यांची सुरवात आश्‍वासक झाली. त्यांना दैवाचीही साथ लाभली. केसमीरोने अर्जेन रॉब्बेनला पाडल्यामुळे बायर्नला 53व्या मिनिटाला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर रॉबर्ट लेवंडोस्कीने खाते उघडले.

रोनाल्डोने 76व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली होती. केसमीरोने भरपाई करीत त्याला अचूक तिरकस पास दिला. मग रोनाल्डोने अप्रतिम हेडिंग केले. 

त्यानंतर 36 सेकंदांमध्ये सर्जीओ रॅमोस याच्या स्वयंगोलमुळे बायर्नला 2-1 अशी आघाडी मिळाली. चेंडू रॅमोसच्या उजव्या पायाला लागून गिरकी घेत जाळ्यात गेला. यामुळे एकूण सरासरीत (ऍग्रीगेट) 2-2 अशी कोंडी झाली. ती निर्धारित वेळेत कायम राहिली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. त्यास सहा मिनिटे बाकी असताना एक महत्त्वाची घटना घडली. बायर्नचा मध्यरक्षक विडाल याला दुसऱ्या पिवळ्या कार्डमुळे मैदान सोडावे लागले. वास्तविक त्याने रेयालचा बदली खेळाडू असेन्सिओ याला रोखताना धसमुसळा खेळ केला नसल्याचे रिप्लेत दिसून आले होते, पण पंचांनी कठोर कारवाई केली. त्याआधी विडालला सहाव्याच मिनिटाला यलो कार्डला सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्याने इस्कोला पाडले होते. 

उत्तरार्धात बायर्नला एका कमी खेळाडूचा फटका बसला. त्यांची काहीशी दमछाक झाली. दुसरीकडे रोनाल्डोने सहा मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. दुसऱ्या गोलच्यावेळी तो ऑफसाइड असल्याचा बायर्नच्या खेळाडूंचा आक्षेप होता. रॅमॉसच्या पासवर गिरकी घेत त्याने चेंडू जाळ्यात मारला तेव्हा तो किमान एका यार्डाने ऑफसाइड असल्याचे रिप्लेत दिसून आले. रोनाल्डोने त्यानंतर मार्सोलोच्या वेगवान चालीचे गोलमध्ये रूपांतर करीत शतक साजरे केले. मार्को असेन्सीओने संघाचा चौथा गोल केला. 

उपांत्यपूर्व फेरीसाठी जास्त चांगल्या पंचांची नियुक्ती व्हायला हवी. अन्यथा व्हिडिओ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. 'युएफा' त्यासाठीच प्रयत्नशील आहे, कारण पंचांकडून बऱ्याच चुका होत आहेत. 
- कार्लो ऍन्सेलोट्टी, बायर्नचे प्रशिक्षक 

निर्णय बरोबर की चूक या वादात मी पडत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. विडालला दुसऱ्यांदा यलो कार्ड दाखवायला हवे असे काही जण म्हणतील, तर इतरांना तसे वाटणार नाही. ख्रिस्तीयानोचे गोल ऑफसाइड असू शकतील, पण त्यामुळे काही बदलणार नाही. तो आमच्यासाठी नेहमीच निर्णायक खेळ करतो. 
- झिनेदीन झिदान, रेयालचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजच्या 'या' कृतिचा अर्थ काय? जाणाल तर भावनिक व्हाल, Video Viral

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार! असोसिएशनकडून राज्यव्यापी बंदची घोषणा, कधी आणि का?

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

SCROLL FOR NEXT