New Zealand lead by 51 runs in 1st test against India  
क्रीडा

INDvsNZ : आधी फलंदाज, मग गोलंदाज... भारताच्या सगळया मर्यादा उघड

सुनंदन लेले

क्रिकेट हा चांगल्या अर्थाने ‘संधिसाधू’चा खेळ आहे असे बोलले जाते ते उगाच नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिली गोलंदाजी करण्याची आणि नंतर फलंदाजांनी चांगल्या होत गेलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करायची संधी बरोबर साधली. भारताचा डाव 165 धावांमधे संपवून गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. नंतर केन विल्यमसनच्या 89 धावांच्या सुंदर खेळीच्या जोरावर 5 बाद 216 ची मजल मारली. दुसर्‍या दिवस अखेरीला 51 धावांची आघाडी हाती असलेला यजमान संघ सामन्याच्या तिसर्‍या दिवशी दडपणाचा बोजा भारतीय संघावर टाकायला जोरदार प्रयत्न करणार आहे.

अनुभवी टीम साउदी आणि पदार्पण करणार्‍या कायल जेमीसनने प्रत्येकी चार फलंदाजांना बाद करून भारताच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवली. भारताचा पहिला डाव 165 धावांमधे गुंडाळण्यात न्यूझीलंड संघाला आलेले यश आणि त्यानंतर सुधारलेल्या खेळपट्टीवर कप्तान केन विल्यमसनने केलेली सुंदर फलंदाजी सामन्याचे भवितव्य ठरवणारे आहे. भारताकडून सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणेच्या त्याही फक्त 46 होत्या याचा विचार करता दर्जेदार स्वींग गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांचे झालेले हाल लक्षात येऊ शकतात.

दुसर्‍या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यावर अहो आश्चर्यम म्हणजे केन विल्यमसनने डावखुर्‍या फिरकी गोलंदाज एजाज पटेलला संधी दिली. रिषभ पंतने ती योजना बघून जिभल्या चाटल्या आणि एजाज पटेलला उत्तुंग षटकार मारला. लगेच केन विल्यमसनने चूक सुधारून वेगवान गोलंदाजांना मारा करायला बोलावले. भारताला पहिला धक्का गोलंदाजांनी नव्हे तर धावा पळताना खराब सामंजस्याने दिला. अजिंक्य रहाणेने चेंडू मोकळ्या जागेत मारून सहजी एक धाव असल्याचे सांगत पळायला सुरुवात केली. रिषभ पंतने चार पावले पुढे येऊन मग नकार देण्याची चूक केली. परिणामी अजिंक्य रहाणे पळत राहिला आणि रिषभ पंत धावबाद झाला.

मुख्य फलंदाजांची जोडी फुटल्याचा धागा पकडत मग टीम साउदीने प्रथम रहाणेला आणि पुढच्याच चेंडूवर अश्विनला बाद करून भारतीय फलंदाजीला हादरे दिले. महंमद शमीने हाणामारी करून 20 धावा केल्याने भारताला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. छाप पाडणार्‍या कायल जेमीसनने चिवट फलंदाजी करण्यात पटाईत असलेल्या ईशांत शर्माला बाद केले. समोरून टीम साउदीला मोठा फटका मारताना शमी बाद झाला आणि भारताचा पहिला डाव 165 धावांवर आटोपला. साउदीने चार फलंदाज 49 तर जेमीसनने चार फलंदाज 39 धावांत तंबूत पाठवले.

पहिल्या दिवशीच्या खेळपट्टीचा दिसणारा हिरवा रंग आणि दुसर्‍या दिवशी दिसणारा काहीसा तपकिरी रंग याच खूप फरक होता. दुसर्‍या दिवशी ताजेपणा निघून गेल्यावर बेसीन रिझर्व्हची खेळपट्टी फलंदाजीकरता चांगलीच पोषक झाली होती. गंभीर गोष्ट ही होती की भारताचा पहिला डाव आटोपला होता आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना सुधारलेल्या वातावरणात फलंदाजी करायची संधी मिळाली.केन विल्यमसनने तीच संधी बरोबर साधली.

फलंदाजीला आल्यावर पहिलाच चेंडू केन विल्यमसनच्या बोटांवर आदळला. शेकाटून निघालेल्या बोटांना पट्टी लावून केन विल्यमसनने नंतर केलेली फलंदाजी सहज सुंदर होती. ईशांत शर्माने तीन फलंदाजांना बाद केले. जसप्रीत बुमराने योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली नाही. विल्यमसन 89 धावांवर असताना शमीच्या गोलंदाजीवर उडालेला झेल रवींद्र जडेजाने पकडला म्हणून भारतीय संघाला थोडा दिलासा मिळाला.  

पहिल्या दिवशीच्या खेळातील बराच काळ पावसाने वाया गेल्याने पंचांनी दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सव्वासात पर्यंत खेळ चालू ठेवला. तिसर्‍या दिवशी न्यूझीलंड संघाच्या उरलेल्या 5 फलंदाजांना बाद करताना किती धावा अजून फलकावर जमा होतात याच गोष्टीवर भारतीय संघाला नजर ठेवावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या १५५ धावा... १८ चौकार अन् ९ षटकार; मुंबईचा दणदणीत विजय

Swiggy Instamart Report : 'या' पठ्ठ्याने वर्षात कंडोमवर खर्च केलेत चक्क १ लाख रुपये! महिन्याला १९ ऑर्डर्स; व्हॅलेंटाईन डेला तर...

Latest Marathi News Live Update : काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Nashik Election : मतदारांपेक्षा ग्रह-ताऱ्यांवरच अधिक भर! नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्तांची 'लगीनघाई'

iPhone 16 फक्त 40 हजारात; 'या' ट्रिकने मिळेल 29 हजारचा डिस्काउंट, ऑफर कुठे सुरुय पाहा

SCROLL FOR NEXT