मुंबई : जागतिक कुस्तीत रौप्यपदक जिंकल्यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल येऊ शकतो, असा विश्वास होता, तेच घडले याचा आनंद आहे, मात्र त्याचवेळी जागतिक स्पर्धेप्रमाणे ऑलिंपिकमध्ये निराश करणार नाही, असा विश्वास दीपक पूनियाने व्यक्त केला.
जागतिक कुस्तीत भारताने पाच पदके जिंकली. त्यातील सर्वोत्तम कामगिरी दीपक पूनियाने केली. त्याने जागतिक कुमार स्पर्धेतील पदक ते जागतिक वरिष्ठ स्पर्धेतील पदक ही कामगिरी अवघ्या एका महिन्यात केली होती. जागतिक कुमार स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला तो पहिला भारतीय कुस्तीगीर ठरला होता.
आता या वेगवान प्रगतीमुळे त्याने 86 किलो गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने या क्रमवारीत गटातील जागतिक विजेता याझदानी याला चार गुणांनी मागे टाकले आहे. जागतिक रौप्य, यासर दोगू स्पर्धेतील रौप्य, तसेच आशियाई ब्रॉंझमुळे दीपकचे 82 गुण झाले.
जागतिक क्रमवारीत अव्वल झाल्यामुळे मी खूष आहे. आपण देशवासीयांनी मला प्रोत्साहित केल्यामुळेच मी हे साध्य करू शकलो. आपल्या पाठिंब्यामुळेच मी आतापर्यंत यश मिळवले आहे. आपले प्रेमच मला भविष्यातील यशासाठी जास्त प्रेरित करेल, असे त्याने सांगितले.
मात्र याचवेळी दीपकला आपण जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरी खेळू शकलो नाही, त्यामुळे देशवासीयांची निराशा झाली याची जाणीव आहे. याबाबत तो म्हणाला, ऑलिंपिकमध्ये मी चाहत्यांची निराशा नक्कीच करणार नाही, त्यासाठी मी आतापासूनच प्रयत्न करणार आहे. त्या स्पर्धेत पदक जिंकण्याचा माझा निर्धार आहे, असे त्याने सांगितले.
|