girija oak godbole
girija oak godbole sakal
लाइफस्टाइल

आनंददायी काळ

गिरिजा ओक

मला आईपणाची चाहूल लागली, तेव्हा परेश रावल यांच्याबरोबर ‘डियर फादर’ (मराठीतल्या ‘काटकोन- त्रिकोण’ या नाटकाचा गुजराती अनुवाद) हे नाटक करत होते. त्याचे भरपूर प्रयोग सुरू होते. तसंच, कलर्स वाहिनीवरील ‘मेजवानी- परिपूर्ण किचन’ हा शो मी होस्ट करत होते. आईपणाची चाहूल लागली, त्यावेळी नाटकांच्या प्रयोगासाठी बाहेरगावी जाणं थोडंसं अवघड होऊ लागलं.

मला खूप उलट्याही होत होत्या, त्यामुळे प्रयोग करताना मला त्रास होत असे. मी प्रेग्नंट होण्यापूर्वी एक- दीड वर्ष अगोदरच नाटक सुरू होतं. या नाटकात मी आणि माझी नणंद मृण्मयी असं आम्हा दोघींचं डबल कास्टिंग सुरुवातीपासूनच ठेवलं होतं. मृण्मयी माझी नणंद असल्यामुळे आणि मी प्रेग्नंट असल्याची गोड बातमी घरातीलच असल्यामुळे तिनंच नाटकाचे बाहेरगावचे प्रयोग; तसंच इतर कामंही सांभाळून घेतली.

चौथ्या-पाचव्या महिन्यानंतर मी नाटकाचे प्रयोग बंद केले; कारण त्यावेळी माझं पोट दिसू लागलं होतं. मात्र, ‘मेजवानी’चं शूटिंग सातव्या-आठव्या महिन्यापर्यंत करत होते. आपण आई होणार ही कल्पना खूप चांगली असते आणि त्यानुसार आपण या काळात काम करत असतो. त्यामुळे काही गोष्टी वगळता फारशी तडजोड करावी लागत नाही.

त्या काळात करिअरबाबत फारसे विचार आले नाहीत, कारण या गोष्टी इतक्या पटापट पुढे जातात, की विचारही करायला वेळ मिळत नाही. त्यावेळी मी अवघी २५ वर्षांची होते. मी खूप मजेत होते. प्रेग्नंसी एन्जॉय करत होते.

आई झाल्यानंतर अनेक गोष्टी कराव्या लागतात. बाळाला डोस द्यावे लागतात, अनेकदा डॉक्टरांकडे जावं लागतं. घरात नातेवाईकही येत असतात, वेगवेगळे कार्यक्रम होत असतात.

आमच्या घरातील माणसं खूप हौशी आणि उत्साही आहेत. त्यामुळे माझं पहिलं वर्ष भर्रकन कसं निघून गेलं, हे मला समजलंच नाही. मला रात्री लवकर झोपायला आणि सकाळी लवकर उठायला आवडतं. आमचा कबीरही खूप गोड होता. फक्त तो रोज रात्रभर जागत असे. त्यामुळे मला त्रास होत असे.

रात्रीचं जागणं सोडून इतर गोष्टींत कबीर खूपच शहाणा होता. त्यामुळे त्याचा मला फारसा त्रास झाला नाही. प्रेग्नंट झाल्यानंतर महिलांना जी वेगवेगळी आव्हानं येतात ती मलाही आली. एक गोष्ट चांगली होती की, मी लहान वयात आई झाले, त्यामुळे सर्व गोष्टी ॲडजस्ट करू शकले.

आई झाल्यानंतर करिअरमध्ये पुन्हा जॉईन होत असताना मी पहिली गोष्ट हाती घेतली ती म्हणजे ‘दोन स्पेशल’ हे नाटक. मग काही दिवसांनी मी ‘मेजवानी’चंही काम सुरू केलं. सगळ्या सेटवर मी कबीरला घेऊन जात असे. त्यावेळी आई आणि माझी सासू यासह कुटुंबातील सर्वांनीच मला खूप मदत केली.

कबीरला कळायला लागल्यानंतर नाटकाचे प्रयोग करत असताना कधी-कधी तो म्हणायचा, ‘तू कुठे चाललीस?, किती दिवस चाललीस?’ त्यावेळी त्याला सोडून जाताना वाईट वाटत असे; पण मी त्याच्याशी कधीही खोटं बोलले नाही. त्याला सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन मी बाहेर पडत असे.

त्यामुळे त्याचा आजही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, की आई जर म्हणत असेल ‘आज मी जाते आणि दोन दिवसांनी परत येते’ तर ती नक्की येईल. त्यामुळे तो घाबरून जात नाही. आई झाल्यानंतर मी माझ्या क्षेत्रामध्ये कामही करत होते आणि मला बरं वाटत असे. कबीरही खूप आनंदात होता. बाहेर जात असायचे, त्यावेळी त्याला माझी आई आणि सासूबाई या दोघी सांभाळत असे.

वयाप्रमाणे आपल्या करिअरकडेही पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. कबीरच्या जन्मानंतर एक गोष्ट मला प्रकर्षानं वाटायची, की माझं काम किती लोकप्रिय होतं किवा नाही होत किंवा मी कोणत्या प्रकारचे काम करते, यापेक्षा कबीरने एका ‘आनंदी वर्किंग आई’ला बघावं. त्यामुळे मी कामाला जात असताना किंवा कामाचे निर्णय घेत असताना त्याला नेहमीच हे सांगितलं, की ‘मी जे काम करते, ते मला प्रचंड आवडतं.

त्यामुळे मी जे काही काम करीन, ते मला आवडलं पाहिजे, त्याच्यात मला आनंद मिळाला पाहिजे.’ कारण सतत रडणारे पालक बघितले आणि सतत ‘अरे बापरे मला हे कामच करावं लागतंय, आता मला ऑफिसला जावं लागतंय आणि बॉसच कसा माझा दुष्ट आहे,’ हे मुलांनी मोठं होताना ऐकलं, तर त्यांचीपण कामाबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार होते. त्यासाठी मला असं वाटायचं, की मी असं काम निवडलं पाहिजे की ज्यामध्ये मला मजा येईल. त्यामुळे त्या अर्थानं माझा करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स..

  • आई होणं आणि आपलं करियर, आपला स्वतःसाठीच वेळ, आपल्या आयुष्यातलं प्रत्येक नातं, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा एक-एक भाग असतात. यापैकी कुठल्याही गोष्टीला संपूर्ण आयुष्य समजणं इथंच सगळ्यात पहिली चूक होते. सगळ्याच महिलांना वाटतं, की मी आई झाले म्हणजे माझं सगळंच आयुष्य त्या बाळाभोवती फिरणार आहे; पण तसं काही होत नाही. कारण सुरुवातीचे काही महिने आपल्याला बाळाला वेळ द्यावाच लागतो, मात्र यानंतर आपलं आयुष्य हे आपलं असतं. मला वाटतं, की सगळ्या गोष्टींना हवा तेवढा, योग्य वेळ देणं आणि हवा तसा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे.

  • आई होण्याची कधी अन् कुठलीही योग्य वेळ नसते. पण तुम्हाला आई होण्याची इच्छा आहे तर हा निर्णय लवकर घेतलेला बरा.

  • आई होण्याचा निर्णय तुम्ही जेवढा उशिरा घ्याल, तेवढा तो निर्णय आपल्याला कठीण वाटत जातो. अर्थात प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाला काय अनुभव येतो, हे त्याच्या प्रवासावर अवलंबून असतं.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT