Lifestyle sakal
लाइफस्टाइल

तिची गोष्ट

‘एखाद्या यशस्वी पुरुषामागे ज्याप्रमाणे एक बाई असते, त्याप्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागे एक कामवाली बाई असते.’... एरवी हे वाक्य ऐकलं असतं, तर मी कदाचित हसले असते!

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समीरा गुजर-जोशी

‘एखाद्या यशस्वी पुरुषामागे ज्याप्रमाणे एक बाई असते, त्याप्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागे एक कामवाली बाई असते.’... एरवी हे वाक्य ऐकलं असतं, तर मी कदाचित हसले असते!... पण ‘नाच ग घुमा’ या चित्रपटात जेव्हा मुक्ता बर्वे साकारत असलेल्या राणी या पात्राच्या तोंडी हा संवाद येतो, तोवर आपण त्या कथेबरोबर इतका प्रवास केलेला असतो, की कुठंतरी आपल्याही आयुष्यातील या फारशा लक्षात न आलेल्या नात्याबद्दल आपण हळवे होऊन गेलेलो असतो.

आता लक्षात येतं आहे, की आई-मुलगी, बहिणी-बहिणी, नणंद-भावजय, जाऊ-जाऊ, सासू-सून यांप्रमाणेच गृहिणी आणि कामवाली बाई हेही एक नातं आहे, एक रिलेशनशिप आहे. त्याची सुरवात व्यवहारानं होत असली, तरी किती सहजपणे माणुसकीच्या, आणि त्याही पुढे जाऊन बाईपणाच्या रंगात रंगून जाणारं नातं आहे हे. एका बाईला दुसऱ्या बाईच्या इतक्या निकट आणणारा एक वेगळाच बंध आहे हा.

बहुतांश कुटुंबाचा अविभाज्य भाग बनून गेलेली ताई किंवा मावशी. गंमत म्हणजे इतर नात्यांप्रमाणे याही नात्याची किंमत अभावातून कळते. कोणत्याही घरी जेव्हा एखाद्या बाईला नोकरीवर घ्यायचं असतं, तेव्हा ‘बघा, तसं आमच्याकडे फार काही काम नाही.’ या वाक्यानं सुरुवात होत असते; पण जेव्हा ताई दांडी मारते, तेव्हा हेच काम अंगावर येतं.

आपल्या घरात रोजच येणारी ही व्यक्ती नकळत आपल्या घरातली होऊन जाते. तिच्या वेळेवर येण्या- न येण्याचा, तिच्या टापटिपीचा, तिच्या हाताला असलेल्या चवीचा आपल्या आयुष्यावर थेट परिणाम होत असतो. म्हणून अनेकदा ‘‘इतकी चांगली बाई म्हणजे भाग्यवान आहेस’’ हे ऐकायला लागतं.

अलीकडेच घडलेला माझ्या एका मैत्रीणीचा किस्सा सांगते. मला भेटली तेव्हा टेन्शनमध्ये वाटली. म्हटलं, ‘काय गं? तुझं तर प्रमोशन होणार असं कानावर आलंय माझ्या. मग चेहरा का असा उतरलाय?’ ती म्हणाली, ‘हो गं, प्रमोशनचं ऐकलंस ते खरं आहे; पण माझी घरकामाची ताई काम सोडायचं म्हणते आहे. तिच्या भरवशावर तर मी घर सोडते.’

‘अगं, मग तिचं काय कारण आहे सोडण्याचं ते विचार आणि काही नाही तर मिळेल दुसरी बाई...’ असं म्हणून मी तिची समजूत काढली खरी; पण ‘तिच्या भरवशावर’ हे शब्द माझ्या मनात घोळत राहिले. भरवसा- विश्वास हा या नात्याचा पाया आहे. हा पाया पक्का असेल, तर मग मात्र या नात्यात आनंदच आनंद असतो.

‘कुठं बाई शोधत फिरायचं? त्यापेक्षा डिश वॉशर घेतला की झालं’, असा विचार अधूनमधून कोणी मैत्रीण बोलून दाखवते; पण भारतीय पिंड यंत्रापेक्षा माणसावर अधिक भरवसा ठेवणारा आहे, माणसात रमणारा आहे. जास्त भांडी असली, की मावशी बोलून दाखवतात हे खरं; पण त्याच मावशी ‘सर्दी झाली वाटतं ताई, तुम्हाला काढा करून देते पाती चहा घालून’ अशी मायाही लावतात. शेवटी बाईपणाच्या धाग्यानं ‘ती’ आणि ‘ती’ घट्ट बांधलेल्या.

मावशींच्या भरवशावर घर टाकून जाणारी मावशींना सांगते, ‘परीक्षा जवळ आली आहे. फार टीव्ही बघू देऊ नका मुलाला.’ ‘नाही ताई, आमच्या घरी पण बजावलं आहे. टीव्ही कमी.... पण ताई, तुम्ही पुस्तकं पाठवली म्हणून खूश आहे. नव्या कोऱ्या वह्या आणि टेक्स्ट बुकं पहिल्यांदा मिळालीत, तर अभ्यासात गोडी वाढली आहे.’ दोघीही आयाच. आर्थिक स्तर वेगवेगळा असला तरी स्वप्न पाहणं सारखंच. अशी साम्यं आहेत खरी; पण कधी कधी दोघींच्या विश्वात किती अंतर आहे, हेही नकळत लक्षात येतं.

माझ्या लेकीला सांभाळणाऱ्या ताईला घेऊन मी लेकीबरोबर थ्री-डी फिल्मला गेले होते. चश्मा घालून फिल्म बघताना ताई आणि लेक दोघी छान खिदळत होत्या. Interval मध्ये ताई म्हणाली, ‘ताई, मी पहिल्यांदा आले आहे.’ मी सहज म्हटलं, ‘थ्री-डी पिक्चरला?’ ती म्हणाली, ‘नाही. थिएटरमध्ये पिक्चर बघायला. नेहमी टीव्हीवर बघते.’ ती अगदी सहज सांगत होती; पण माझ्या काळजात काहीतरी हललं.

‘मग काय काय करतेस तू?’ ती घरी कामासाठी विचारायला आली, तेव्हा मी विचारलं होतं. तिनं जे येतं सांगितलं त्यात ‘तुमच्या पोरीवर बहिणीसारखी माया करेन’ हे म्हणाली नव्हती, ‘तुम्ही काही विसरलात, तर धावत तुमच्या मागे येऊन देईन’ असंही सांगितलं नव्हतं. असं कितीतरी.... आता मला विचार करायला हवा, की मी तिच्यासाठी काय काय करू शकते?!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

SCROLL FOR NEXT