Sangli Lok Sabha Seat Mahavikas Aghadi  esakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

राज्यात काहीच मतदारसंघांत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार युद्ध सुरू आहे.

शेखर जोशी

'बाळासाहेब ठाकरे यांचे वसंतदादा पाटील यांच्याशी खूप घनिष्ठ संबंध होते आणि शिवसेना मुंबईत विस्तारण्यासाठी बाळासाहेबांना दादांची मदत झाली वगैरे मोठा इतिहास आहे.'

Sangli Lok Sabha : राज्यात काहीच मतदारसंघांत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत जोरदार युद्ध सुरू आहे. यामध्ये ‘सांगली’च्या जागेचा बोलबाला आता गल्ली ते दिल्ली पोहोचला आहे. गेली पंधरा दिवस काँग्रेस नेते रोज खुलासा करत आहेत की, काहीही करून ‘सांगली’ काँग्रेसकडेच (Congress) राहील; आणि असे असतानाच उद्धव ठाकरे आले, त्यांनी सभा घेतली.

चंद्रहारच्या हाती ‘मशाल’ दिली आणि काँग्रेस पाहत बसली... आता हा ‘मातोश्री’वरील शब्द आहे. तो ठाकरेंचा सुटलेला बाण आहे. तो नुसता बंद दाराआडचा शब्द नसून थेट जाहीर सभेतला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते जरी म्हणत असले की, ही जागा आम्ही मिळवूच, तरी मिरजेत झालेल्या सभेने ठाकरे यांनी काँग्रेसच्या उरल्या-सुरल्या आशेवर पाणी टाकले आहे.

काँग्रेस नेत्यांना वाटले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वसंतदादा (Vasantdada) यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे उद्धव ठाकरे या भावनिक आवाहनावर काँग्रेसला जागा देतील. यावर काँग्रेसने पत्रे देखील लिहिली. आता सांगलीत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वांत आधी वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर विशाल पाटील यांच्या मातोश्री आणि काँग्रेस नेत्या शैलजा पाटील यांच्याशी एकच मिनिट चर्चा केली. ‘तुम्ही निश्चिंत राहा, आपण एकत्र जाऊ,’ असेही ते म्हणाले. तेव्हा क्षणभर वाटलं की, मिरजेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काहीतरी सामंजस्याची भूमिका घेतील.. पण काँग्रेसची ही सर्व स्वप्नं धुळीस मिळाली.

नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाक्‌युद्ध झाले होते. याच सभेत संजय राऊत यांनी प्रास्ताविकात, ‘ठाकरे दिलेला शब्द मोडत नाहीत,’ असा डफ एवढा वाजवला की, उद्धव ठाकरे यांनी या सभेत जी घोषणा करायची टाळली असती, ती करून टाकली. परंतु एकंदरीतच शिवसेनेने ‘कोल्हापूर’च्या बदल्यात पर्यायी ‘सांगली’ची जागा मागितली, हे त्यांचे मागणे रास्तच आहे. मुळात काँग्रेसला, ‘कोल्हापूर’ घेताना आपल्याला एखादी मोठी जागा सोडावी लागणार का, याची कल्पना असायला हवी होती.

‘सांगली’ सोडून दुसरा पर्याय त्यांनी द्यायला हवा होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी गेल्या म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ही जागा राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ला दान करून टाकली होती. स्वाभिमानीकडे तर त्या वेळी पर्यायी उमेदवार सुद्धा नव्हता. त्यांना उसना उमेदवार घेऊनच लढावं लागलं होतं. मात्र आता तर ठाकरे यांनी आधी पंधरा-वीस दिवस चंद्रहार यांना आपल्या पक्षात घेऊन त्यानंतरच सभा घेऊन ही घोषणा केली आहे. त्यामुळे जे त्यांनी केलं, ते पूर्वनियोजित होतं, असं म्हणण्यास आधार आहे.

आता ही जागा काँग्रेसला मिळेल, या गोड गैरसमजात काँग्रेसने राहणे कितपत योग्य आहे, हा सवाल आहे. आता उदाहरणे दिली जात आहेत की, पंजाब, बंगालमध्ये काही ठिकाणी काँग्रेसने मित्रपक्षांसमवेत मैत्रीपूर्ण लढती केलेल्या आहेत. तशा पद्धतीची मैत्रीपूर्ण लढत इथे अपेक्षित आहे का? त्यासाठी राहुल गांधी किंवा काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी परवानगी देतील का, हाच तेवढा एक मुद्दा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे वसंतदादा पाटील यांच्याशी खूप घनिष्ठ संबंध होते आणि शिवसेना मुंबईत विस्तारण्यासाठी बाळासाहेबांना दादांची मदत झाली वगैरे मोठा इतिहास आहे...तो उद्धव ठाकरेंना आणि सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र सध्या तरी या नात्याचा काही उपयोग होईल, असे चित्र दिसत नाही. मुळात काँग्रेसच्या हायकमांडना ‘सांगली’बद्दल काही वाटत नसेल, तर सध्या सांगली आम्ही मिळवणारच, हे काँग्रेस नेत्यांचे गळा काढणे एक अरण्यरूदन ठरणार आहे.

अर्थात, वसंतदादा घराणं संपवण्यासाठी हा काहींचा प्लॅन आहे का, असे आरोप गेल्या वेळी झाले होते. यावेळी होत राहतील, पण यातून काँग्रेस सावरेल का, याचे उत्तर मिळत नाही. मुळात कोल्हापूर सेनेचा बालेकिल्ला होता, तर त्यांनी तो का सोडला? आणि सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तर तो ते का सोडतात? या गोंधळात महाविकास आघाडीत आंधळी कोशिंबीर सुरू आहे, असेच चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेली घोषणा मागे घेतील, असे आता मात्र वाटत नाही, एवढे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT