मुंबई : जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अन्य काही खासदार ‘मातोश्री’च्या संपर्कात असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीने संधी नाकारलेल्या चार-पाच मावळत्या खासदारांच्या मनातील खदखदीला साद घालण्याचे ‘ऑपरेशन’ ठाकरे गटाकडून सुरू आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या नाराज मंडळींची माहिती घेणे सुरू केले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजांचा शोध घेणे सुरू केले असून काँग्रेसची मदत घेतली जात आहे. तिकीट नाकारलेल्या खासदारांमार्फत काही आमदारांशीही संपर्क साधला गेला असल्याचे समजते. विभाजित झालेल्या शिवसेनेचे नव्हे तर भाजपचे खासदार असलेले उन्मेष पाटील उमेदवारी नाकारल्याने बंड करतील, असे वाटले नव्हते. पण उद्या (ता.३) सकाळी ते ‘मातोश्री’वर दाखल होणार, हे कळताच महायुती सावध झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे येथे काही भेटीगाठी घेतल्या अन् त्यानंतर सायंकाळी ते ‘वर्षा’ या निवासस्थानी भावना गवळी, हेमंत गोडसे या अद्याप उमेदवारी घोषित न झालेल्या खासदारांना भेटले. मुख्यमंत्री शिंदे यांचा खासदार-आमदाराशी उत्तम संबंध असला तरी कोणतीही शक्यता नजरेआड करून चालणार नाही, असे त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
भाजपने शिंदे यांच्या बंडाचे महत्त्व लक्षात घेत त्यांना १४ जागा देण्याची तयारी दर्शवली होती, पण प्रत्यक्षात भाजपने संधी नाकारलेले उन्मेष पाटील हेच सर्वप्रथम ‘मातोश्री’कडे निघाले आहेत. आज उन्मेष पाटील यांच्याशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुऴे यांनी संपर्क साधला. मात्र तोडगा निघू शकला नाही असे समजते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.