Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

निवास चौगले

अवघ्या १४ हजार ७५३ मतांनी श्री. महाडिक या निवडणुकीत पराभूत झाले. श्री. पवार यांच्या या एका वाक्याने फिरलेल्या निवडणुकीची आजही चर्चा होते.

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा. राज्यात आणि देशात एक निकाल आणि कोल्हापुरात एक निकाल अशी इथली परंपरा. लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय लोकांच्याच पचनी पडत नाही, हा इथला इतिहास. या इतिहासाचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्याची झलक पहायला मिळाली. बिंदू चौकात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘कौन है यह मुन्ना, कहाँसे आया’ एवढं एकच वाक्य उच्चारले आणि या वाक्यावरच निवडणुकीचा निकाल फिरला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ मध्ये कै. सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) पहिल्यांदा खासदार झाले, त्यावेळी ते काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हावर रिंगणात होते. या निवडणुकीत सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या कै. उदयसिंगराव गायकवाड यांना डावलून काँग्रेसने कै. मंडलिक यांना रिंगणात उतरले होते. १९९९ मध्ये मध्यावधी निवडणुका लागल्या आणि त्याच दरम्यान काँग्रेसमधून श्री. पवार बाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली.

काँग्रेसच्या फुटीनंतरची १९९९ ची लोकसभा ही पहिलीच निवडणूक. या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ती लढवली. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा कै. मंडलिकांवर विश्‍वास दाखवला, तर काँग्रेसकडून कै. गायकवाड रिंगणात उतरले. यात कै. मंडलिक यांनी बाजी मारली. २००४ च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस राज्यात एकत्र लढले. त्यात ज्यांचा विद्यमान खासदार त्यांना उमेदवारी ठरली. त्यातून कै. मंडलिक पुन्हा रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात कोण? हा शिवसेनेसमोरचा मोठा प्रश्‍न होता. याच दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेची तयारी करवीरमधून सुरू केली होती. श्री. पाटील यांची व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची त्यावेळी गट्टी होती.

त्यातून श्री. पाटील यांनी श्री. महाडिक यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची गळ घातली. निवडणूक जाहीर झाली, त्यावेळी धनंजय महाडिक हे सहकुटुंब तिरुपती दौऱ्यावर होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहिलेल्या कै. विक्रमसिंह घाटगे यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाकडे शिफारस केली. त्यातून धनंजय महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार ठरले. अवघ्या पंधरा-वीस दिवसांत त्यांनी मतदारसंघात रान उठवले.

करवीरच्या विधानसभा निवडणुकीत महाडिकांची ताकद मिळेल म्हणून सतेज पाटील यांनी उघडपणे नाही; पण छुप्या पद्धतीने आपली सर्व ताकद धनंजय महाडिक यांच्या मागे लावली. महाडिकांचा बळाचा पट आणि ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांची साथ त्यांच्यासोबत होती. एका बाजूला अनुभवी कै. मंडलिक आणि दुसऱ्या बाजूला सर्व पातळीवर ताकदीनिशी उतरलेले धनंजय महाडिक असा सामना रंगला.

प्रचारा दरम्यान नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होता; पण त्यावेळी श्री. महाडिक यांचेच पारडे जड होते, असे चित्र होते. दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र असूनही कै. मंडलिक विजयी होतील का नाही, अशी शंका वाटावी, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य पातळीवरील नेतेही हतबल होते. अशातच शरद पवार यांची प्रचाराची शेवटची सभा कोल्हापुरातील बिंदू चौकात झाली. त्यावेळी बिंदू चौकात प्रचाराच्या सभेसाठी परवानगी होती. मतदारसंघात महाडिकांचा बोलबोला आणि या शेवटच्या सभेत सर्वच नेत्यांची मुळमुळीत भाषणे सुरू झाल्यानंतर बिंदू चौकातून लोकांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली होती. तोपर्यंत श्री. पवार भाषणाला उभारले.

त्यांच्याकडूनही सरकारच्या कारभारावर टीका करण्यापलीकडे काही नव्हते. भाषणाचा शेवट जवळ आला, तरी श्री. पवार यांचे आक्रमक भाषण काही होईना तशी सभेत अस्वस्थता वाढली; पण शेवटच्या टप्प्यात श्री. पवार यांनी स्थानिक मुद्याला हात घातला आणि ‘कौन हे यह मुन्ना, कहाँसे आया’ एवढाच प्रश्‍न विचारला आणि सभेचे वातावरणच पालटले आणि या एका वाक्यावर कै. मंडलिक यांचा विजय सुकर झाला. अवघ्या १४ हजार ७५३ मतांनी श्री. महाडिक या निवडणुकीत पराभूत झाले. श्री. पवार यांच्या या एका वाक्याने फिरलेल्या निवडणुकीची आजही चर्चा होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT