पुणे - राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ सहाव्या आठवड्यात आतापर्यंतची उच्चांकी ठरली आहे. गेल्या पाच आठवड्यांहून अधिक रुग्ण सहाव्या आठवड्यात आढळले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई-पुण्यातील आहेत.
राज्यात 9 मार्चला कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले. गेल्या 42 दिवसांमध्ये 31 जिल्ह्यांपर्यंत या विषाणूचा संसर्ग वाढला आहे. राज्यात सहा आठवड्यात कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव कसा झाला, त्यात दर आठवड्यात किती नव्या रुग्णांची भर पडत गेली याच्या विश्लेषणावरून हा निष्कर्ष निघाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
असा वाढला कोरोनाचा संसर्ग
- पहिला आठवडा (9 ते 15 मार्च)
राज्यात पहिल्या आठवड्यात 32 रुग्णांची नोंद झाली. दुबई येथे सहलीला गेलेल्या प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचा त्यात समावेश होता. त्यामुळे पुण्या-मुंबईसह यवतमाळमध्येही कोरोनाबाधित पहिल्या आठवड्यात आढळले. या सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यामुळे 14 दिवसांमध्ये हे रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.
- दुसरा आठवडा (16 ते 22 मार्च)
या आठवड्यात दुबईसह इतर देशांमधून राज्यात परत आलेल्या नागरिकांची संख्या जास्त होती. त्यात अमेरिका, इंग्लंड, फिलिपाइन्स अशा देशांमधून प्रवास करून आलेल्यांची संख्या मोठी होती. तसेच, त्यांच्याशी संपर्कात आलेल्या घरातील व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान या टप्प्यात होऊ लागले.
- तिसरा आठवडा (23 ते 29 मार्च)
राज्यात एकत्रित रुग्णांची संख्या 129 पर्यंत वाढली. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास चार पटींनी ही संख्या वाढल्याचे दिसते. या 129 रुग्णांमध्ये 87 नवीन रुग्ण तर, 42 आधीच्या दोन आठवड्यातील रुग्णांचा समावेश आहे. या आठवड्यापासून रुग्णांना नेमका कोणामुळे संसर्ग झाला, याची नेमकी माहिती आरोग्य खात्याला मिळत नसल्याचे दिसून आले. परदेशात प्रवास केलेला नाही किंवा परदेशातून आलेल्या रुग्णांमध्ये संपर्कात न आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे या आठवड्यात जाणवू लागले.
- चौथा आठवडा (30 मार्च ते 5 एप्रिल)
या आठवड्यात पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. त्यानंतर पुढील 21 दिवसांमध्ये पुण्यात मृतांच्या संख्येने पन्नासचा आकडा ओलांडला. या आठवड्यात कोरोनाचा संसर्गामुळे गुंतागुंत वाढली. काही रुग्ण अत्यवस्थ होऊ लागले. यात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
- पाचवा आठवडा (6 ते 12 एप्रिल)
राज्यातील मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची आणि त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. पुणे-मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या पुण्या-मुंबईत रुग्णांची संख्या वाढलीच, पण नागपूर, ठाणे, मालेगाव, पिंपरी-चिंचवड या भागातही रुग्णांची नोंद झाली. या आठवड्यात राज्याने हजार रुग्णांचा आकडा ओलांडला.
- सहावा आठवडा (13 ते 19 एप्रिल)
राज्यात गेल्या पाच आठवड्यांमध्ये एक हजार 982 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, सहाव्या या एकाच आठवड्यात दोन हजार 218 रुग्ण आढळले. त्यामुळे सहाव्या आठवड्याच्या शेवटी राज्यात कोरोनाबाधित 4 हजार 200 रुग्ण नोंदविण्यात आले. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णांची ही वाढ 131 पट जास्त आहे. या आठवड्यात 12 एप्रिलपासून निदान झालेल्या रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.
अशी झाली वाढ
- पहिला आठवडा - 32 रुग्णांची नोंद
- दुसरा आठवडा - नवीन 10 रुग्णांची वाढ
- तिसरा आठवडा - रुग्णसंख्या 129
- चौथा आठवडा - 416 नवीन रुग्णांची भर
- पाचवा आठवडा - नव्याने 689 रुग्ण वाढले
- सहावा आठवडा - एकूण 4200 रुग्ण. पहिल्या पाच आठवड्यातील 1982 रुग्ण होते. या एकाच आठवड्यात या पाच आठवड्यांपेक्षा जास्त म्हणजे 2218 रुग्णांची नोंद
पुढे काय होणार
- 80, 15 आणि 5 टक्के फॉर्म्युला
लॉकडाउनमुळे सगळं कुटुंब सध्या घरात सुरक्षित आहे. पण, नजीकच्या भविष्यात घराबाहेर पडल्यानंतर कोरोनाचा संसर्गाचा धोक्याची शक्यता कायम राहील. त्या वेळी प्रत्येकाच्या प्रतिकारशक्ती महत्त्वाची भूमिका राहील. राज्यातील 80 टक्के लोकांना संसर्ग होईल. पण, त्याची स्पष्ट लक्षणे दिसणार नाही. प्रतिकारशक्तीच्या बळावर तो बरा होईल. 15 टक्के रुग्णांना कोरोनाच्या संसर्गाची स्पष्ट लक्षणे दिसतील. सर्दी, खोकला, ताप किंवा थोडा दम लागणे इतपर्यंत ही लक्षणे असतील. उर्वरित पाच टक्के रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल. त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा विकाराचे रुग्ण अत्यवस्थ होतील. यात मृत्यूचे प्रमाणात वाढेल.
उपाय काय?
सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) हा एक प्रभावी मार्ग असल्याचे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. पुढील काही दिवसांनी या विषाणूला प्रतिकार करण्याची सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होईल. यासाठी इन्फेक्शन (जंतूसंसर्ग) किंवा इम्युनायजेशन (लसीकरण) हा दोन मार्ग उपयुक्त ठरतात. कोरोनावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची शक्यता कमी आहे.
पुण्याची जमेची बाजू
पुण्यात यापूर्वी स्वाइन फ्लूच्या (एच1एन1) विषाणूंचा संसर्ग झाला. डेंगी आणि चिकुनगुण्याचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. हे विषाणूजन्य आजार आहेत. त्यांच्या संसर्गामुळे काही पुणेकरांमध्ये विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. या तिन्ही विषाणूंच्या ऍन्टिबॉडी शरीरात तयार झाल्या आहेत. त्याचा काही अंशी फायदा पुणेकरांना होऊ शकेल, याबद्दल संशोधन सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.