सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी गाडीला फॅन्सी नंबरप्लेट लावले आहेत. याशिवाय अनेकांनी कंपनीचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविले आहे. अशा वाहनांवर आता शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मागील दहा दिवसांत एक हजार ८८९ वाहनांवर कारवाई करीत त्यांना तब्बल १५ लाख रुपयांचा दंड देखील केला आहे.
सोलापूर शहरातील वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिस आता चौकाचौकात उभारुन बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत आहेत. कारवाई करताना पकडलेल्या वाहनावर पूर्वीचा दंड असल्यास तो ऑनलाइन भरुन घेतला जातो. बेशिस्त वाहनास शक्यतो ऑनलाइन दंड केला जातो. ‘ई-चालान’मुळे रोखीने दंड घेतला जात नाही. त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण लक्षणीय असल्याची स्थिती आहे.
पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यांवरुन बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहने चालवावीत, जेणेकरुन अपघात होणार नाही असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
‘त्या’ वाहनास एक हजाराचा दंड
फॅन्सी नंबरप्लेट व मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहन चालकास प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड केला जातो. १ ते १० फेब्रुवारी या काळात शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५२३ मॉडिफाईड सायलेन्सर लावलेली वाहने आणि एक हजार ३६६ फॅन्सी नंबरप्लेट लावलेली वाहने आहेत.
सावधान, ३३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तुम्ही होताय कैद
सोलापूर शहरात स्मार्ट सिटीतून विविध चौकांमध्ये ३३० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातून बेशिस्त वाहनचालकांना ऑनलाइन दंड करण्याची देखील कार्यवाही सुरु आहे. ट्रिपलसिट, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईल टॉकिंग अशा वाहनचालकांवर नियमितपणे दंड केला जात आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.