सोलापूर : एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना २ ते १७ मे या काळात उन्हाळा सुटी असणार आहे. तर अंगणवाड्यांमधील मदतनीस कर्मचाऱ्यांना १८ मे ते २ जूनपर्यंत उन्हाळा सुटी असेल. तसे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत. पोषण ट्रॅकरवरील नोंदी, सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही ७५ हजार ते एक लाखापर्यंतच आहे. याशिवाय मदतनीस व सेविकांना पाच हजार रुपयांचे मानधन वाढले. पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे. त्यातच केंद्राने पोषण ट्रॅक्टरवर दररोजच्या नोंदी करण्यासाठी ‘एफआरएस’ प्रणाली आणली आहे. दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना केवळ १५ दिवसांचीच उन्हाळा सुटी मिळणार आहे.
प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४५ दिवसांची उन्हाळा सुटी असते. त्याप्रमाणेच अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळा सुटी असावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे.
निर्णयावर बहिष्कार, १ मेनंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार
पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद करताना विद्यार्थ्याच्या पालकाला बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन नोंद करावी लागणार आहे. ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळखाऊ आहे. या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळ्याची सुटी घ्यावी. ही ‘एफआरएस’ पद्धत बंद करावी, यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे. या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुटी उशिराने व कमी दिवसांची मिळणार आहे. त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे.
- सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती
‘एफआरएस’ पद्धत काय आहे?
केंद्र सरकारने अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना ‘एफआरएस’ची नवी पद्धत लागू केली आहे. त्यानुसार पोषण आहार दिल्यावर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाचा फोटो काढला जातो. त्यानंतर पोषण ट्रॅकरवर त्याची नोंद करताना पालकाच्या मोबाईलवर ओटीपी जातो. तो ओटीपी सांगितल्यावर त्याची नोंद होते. पण, यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांचे पालक ओटीपी द्यायला तयार नसतात, उलट सेविकांनाच विचारतात तुम्ही आमच्याकडून ओटीपी घेता, आधी आहार चांगला द्या. अशा गोष्टींमुळे ही नवी प्रणाली बंद करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.