सोलापूर : गणेशोत्सवात परिसरातील किंवा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांकडून वर्गणी जमा केली जाते. मात्र, सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीविना वर्गणी गोळा केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे.
सोलापूरच्या धर्मादाय सहआयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ‘४१ क’नुसार विविध जयंती, सण-उत्सवात वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी दिली जाते. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध सार्वजनिक गणेश मंडळे लोकांकडून उत्सवासाठी देणगी गोळी करीत असतात. पण, देणगी किंवा वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाची परवानगी कायद्याने बंधनकारक आहे.
परवानगी न घेता वर्गणी गोळा करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे मंडळांकडून अशी वर्गणी गोळा केली जाणार असेल तर अधिकृत परवानगी काढून घ्यावी, असे आवाहन धर्मादाय सहआयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने केले आहे.
परवानगीसाठी ‘ही’ कागदपत्रे जोडून असा करा अर्ज
देणगी गोळा करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५०मधील कलम ‘४१ क’नुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी घ्यावी. परवानगी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने दिली जाते. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी charity.maharashtra.gov.in संकेतस्थळावर event registration मध्ये जाऊन अर्ज करावा. अर्जासोबत दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, मंडळाचा ठराव, दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड), जागा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, पत्ता किंवा पुरावा म्हणून लाइट बिलाची झेरॉक्स प्रत, गतवर्षी परवानगी घेतली असल्यास त्या वर्षाचा परवानगी आदेश व हिशेबपत्रक (रक्कम पाच हजारांवर असल्यास लेखापरीक्षकाची स्वाक्षरी व शिक्का लागतो) जोडणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षी परवानगी घेत असल्यास केवळ कागदपत्रे जोडल्यावर परवानगी मिळते. ऑनलाइन अर्ज करताना ही कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी लागतात. तसेच ऑफलाइन अर्जासोबतही तीच कागदपत्रे लागतात.
अर्ध्या तासात ऑफलाइन परवाना
ऑनलाइन अर्ज करण्यास सध्या अडचणी असल्याने सोलापूर धर्मादाय कार्यालयाने परवानगीसाठी ऑफलाइनची सोय केली आहे. कार्यालयात येऊन संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास अवघ्या अर्ध्या तासात परवाना मिळतो, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.