सोलापूर : आम्ही आमदार आहोत?, तुम्ही आणि तुमचे अधिकारी आमचा फोनही घेत नाहीत. ई-चालन फाडल्यावर परत काही करता येत नसल्याचे सांगता?, जड वाहतुकीत तुम्ही काय करता? याच्याशी आम्हाला ‘देणं घेणं’ नाही. शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने अडवू नका, अशी सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे यांनी केली. वाहनांसाठी आरटीओंनी केलेले रेटकार्ड, पासची चर्चा आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली.
आमदारांच्या प्रश्नांची तीव्रता पाहून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना उत्तर देण्यास उभा केले. नेरपगार यांनी इतर माहिती देण्यास सुरवात केली असता विषय फक्त शेतकऱ्यांची लहान वाहने धरण्याचा आहे, तेवढेच बोला, बाकीचे बोलू नका, असे पालकमंत्री गोरे यांनी सुनावले. शेतकऱ्यांची वाहने अडवू नका, जेवढं सांगितलंय तेवढंच करा, बाकीचं काढलं तर तुमचा कार्यक्रम होईल, अशी टीप्पणी पालकमंत्री गोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांच्याबद्दल केली. आमदार अभिजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या (तरकारी) पीकअपसाठी १५०० रुपयांचा हप्ता घेतात. हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर त्रुटी काढून जास्तीचा दंड आकारला जातो. या विषयात जास्त उकरलं तर अडचण होईल. उत्सुकतेपोटी पालकमंत्री गोरे म्हणाले, कोणाची अडचण होईल. त्यावर आमदार पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांची अडचण होईल. आरटीओंच्या वसुली मोहिमेबद्दल आमदार कल्याणशेट्टी, आमदार आवताडे यांनीही आपला अनुभव सांगितला.
टार्गेट वसुलीचा मेसेज
सरकारने दिलेल्या महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी तुम्ही ही वसुली मोहीम राबवीत असल्याचा मेसेज सर्वसामान्यांपर्यंत गेला असल्याची टीप्पणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. पूर्वी मार्च अखेरीस जे चित्र दिसत होते, ते आता एप्रिल आणि मेमध्येही दिसू लागल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देशमुख म्हणाले, अवैध व्यवसाय सुरूच
सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत वाळू उपसा, डान्सबार, मटका व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या अडवून आरटीओ व पोलिस रक्कम वसूल करत असल्याचा आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी केला. त्यांच्या या आरोपावर पालकमंत्री गोरे म्हणाले, अनधिकृत वाळू थांबली नाही का?, त्यानंतर आमदार देशमुख यांनी अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक थांबल्याचे मान्य केले.
पर्यटकांच्या लुटीवर ‘सकाळ’चा प्रकाश
‘परजिल्ह्यातील भाविक ठरताहेत टार्गेट’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने १६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले आहे. आरटीओंची दहा पथके, दरमहा प्रत्येकी २० लाखांच्या वसुलीची सक्ती देण्यात आले असल्याच्या मुद्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पर्यटकांच्या अडवणुकीचा मुद्दा, उद्दिष्ट वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. या चर्चेत आमदार अभिजीत पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी यांनीही सहभाग नोंदविला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नुसतीच चर्चा होते की, त्याचा काही उपायोगही होतो, हे येत्या काळात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.