CM eknath shinde mla report card maharashtra vidhan bhavan cabinet minister thane shiv sena CM of Satara for fourth time sakal
महाराष्ट्र बातम्या

कोयनाकाठचा रिक्षाचालक ते मुख्यमंत्री! एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा प्रवास

शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद

सकाळ वृत्तसेवा

भिलार (जि.सातारा) : राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू बनलेले एकनाथ शिंदे आज अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने साताऱ्याच्या कोयनाकाठाला एक सुखद धक्का बसला. शिंदे यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला मिळालेले हे चौथे मुख्यमंत्रिपद आहे.यापूर्वी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण या सातारा जिल्ह्यातील तीन नेत्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. शिंदे यांच्या अनपेक्षित निवडीमुळे सातारा जिल्हा सुखावला आहे. रिक्षाचालक, शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेता असा प्रवास करत ते आता थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले असून, ही त्यांची वादळी वाटचाल थक्क करणारी आहे.

शिवसेनेत प्रवेश

महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब हे शिंदे यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. शिंदे यांची घरची परिस्थिती अगदी गरीब होती. शिक्षण पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाणे गाठले. त्यांनी वागळे इस्टेटमधील माशांच्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर रिक्षा चालवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रभाव पडला. या दोघांकडे आकर्षित होऊन त्यांनी १९८० मध्ये केवळ १६ व्या वर्षी शिवसेनेचा झेंडा शिंदे यांनी हाती घेतला. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. एक सच्चा शिवसैनिक म्हणून नावलौकिक मिळवला.

मंत्रिपदापर्यंत मजल

त्यानंतर ते किसन नगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. एका दुर्घटनेत त्यांची दोन मुले कोयना धरणात बुडून मृत्युमुखी पडली. त्यावेळी खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते आनंद दिघे यांनी. सभागृहनेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना शिवसेनेच्या अधिक व्यापात अडकवले. शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. संघटनेत काम करताना स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा उरक यामुळे त्यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकत भगवा आदिवासी भागापर्यंत फडकविला. २००४ पासून ते सलग चौथ्यांदा ठाण्यातून आमदारपदी निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री अशा पदांची धुरा सांभाळली. जानेवारी २०१८ मध्ये शिंदे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री बनले. सध्या ते नगरविकास मंत्री होते.

उल्लेखनीय शैक्षणिक प्रगती

एकनाथ शिंदे यांना अकरावीनंतर शिक्षण शिक्षण अर्धवट सोडावे लागले, परंतु शिकण्याची जिद्द आणि इच्छा मात्र प्रबळ होती. त्यामुळेच आयुष्यात काहीसे स्थैर्य आल्यानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. नुकतीच त्यांनी मराठी आणि राजकारण असे दोन विषय घेऊन तृतीय वर्ष बी.ए.ची परीक्षा दिली आणि ७७.२५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आता ते एम.ए. करत आहेत. त्यांनी मुलगा श्रीकांत याला मात्र डॉक्टर केले.

विधिमंडळावर ठसा

२००४ ते २०१४ अशा १० वर्षांच्या काळात विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने एकनाथ शिंदे यांनी अनेक समस्यांवर, राज्यापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांबरोबरच सागरी सुरक्षा, पोलिस दलाचे आधुनिकीकरण, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे गाजली.

महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांनी आमच्या विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे दोन (पदवी आणि पदविका ) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले आहेत. त्यांना त्यांच्या पुढील यशोदयी वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

- प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार, संचालक, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT