तात्या लांडगे
सोलापूर : अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमूना म्हणून उजनी धरणाकडे (यशवंतसागर) आश्चर्याने पाहिले जाते. माती, सिमेंट काँक्रिट व दगडाने तीन किलोमीटर बांध तयार करून त्यावर ४१ दरवाजे काढण्यात आले आहेत. सर्वाधिक दरवाजे आणि सर्वाधिक मृतसाठा (६३ टीएमसी) असलेले राज्यातील एकमेव धरण म्हणून उजनीची ख्याती आहे. ११ वर्षांत बांधून पूर्ण झालेले धरण ४५ वर्षांतनंतरही तेवढ्याच दिमाखात उन्हाळ्यात टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी हातभार लावत आहे.
पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार कृष्णा खोऱ्यातील ५८५ टीएमसी तर भीमा खोऱ्यातील ९५ टीएमसी पाणी अडविण्यात आले. त्यात उजनी धरणात ८४ टीएमसी पाणी साठविले जाते. पावसाळ्यात उजनीत मोठा विसर्ग येतो, त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी उजनीत १२३ टीएमसीपर्यंत पाणी साठवले जाते. धरण जरी दरवर्षी उणे पातळीत जात असले तरी धरणामुळे दुष्काळी जिल्हा ही सोलापूरची ओळख पुसली गेली आहे. रब्बीच्या जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र उजनी धरणामुळेच वाढले आहे.
आगामी काळात उजनीवरून सांगोला, बार्शी, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट अशा तालुक्यांना विविध उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. जिल्ह्यात उजनीमुळेच हरितक्रांती झाली आहे. उजनी धरणाचे बांधकाम भक्कम असून कोयना, जायकवाडी या मोठ्या धरणांच्या तुलनेत उजनीवरील दुरूस्तीचा खर्च अत्यल्प आहे. धरणातील पाणी २०० किमी दूरवर पसरले तरी धरण भक्कम राहिल्याचे दरवर्षीच्या पर्जन्यपूर्व व पर्जन्यउत्तर तपासणीतून दिसून येते, असे अभियंते सांगतात.
‘उजनी’मुळे वाढली ४० हजार कोटींची उलाढाल
उजनी धरणाचा आधार सोलापूर-पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांना आहे. याशिवाय दीड लाख हेक्टरवरील क्षेत्राला उजनीतून थेट पाणी मिळते. १२५ पेक्षा जास्त ग्रामपंचायती, सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, इंदापूर अशा शहरांचा पाणीपुरवठा देखील उजनीवरच अवलंबून आहे. मत्स्यव्यवसाय उजनीवर मोठा चालतो. उजनी धरणामुळे दरवर्षी जिल्ह्यातील उलाढाल ४० हजार कोटींनी वाढल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात.
उजनी धरणाचे वैशिष्ट्य...
१९६९ ते जून १९८० अशा ११ वर्षांत पूर्ण झाले धरणाचे काम
धरण बांधणीसाठी झाला ३२२ कोटी ९५ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च
एकूण साठवण क्षमता १२३ टीएमसी, सर्वाधिक ६३ टीएमसी मृतसाठा असलेले धरण
सर्वाधिक ४१ दरवाजे असलेले एकमेव धरण; तीन किमी लांबीचा मातीचा भराव
माती, क्राँक्रिट व दगडाचा बांध; सांडवा ६०३ मीटरचा