Accused Manisha being brought to court in connection with the Dr. Shirish Valsangkar case
तात्या लांडगे
सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून १८ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज सुनावणी होती. मात्र, सरकार पक्षाने मुदतवाढ मागितली. दरम्यान, त्यावेळी मनीषा यांनी ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत डॉ. शिरीष यांच्यासह महत्त्वाच्या साक्षीदारांचे पाच महिन्यातील सीडीआर व मोबाईल लोकेशन न्यायालयात सादर करावे किंवा ते जतन करून ठेवावे, अशा मागणीचा अर्ज दिला आहे. त्यावर आता २७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या सुसाईड नोटवरून डॉ. अश्विन वळसंगकर यांनी मनीषा मुसळे यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी १९ एप्रिल रोजी मनीषा यांना अटक केली. ६७ दिवसांनंतर मनीषा यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. तत्पूर्वी, पोलिसांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यात तपास अधिकाऱ्यांनी डॉ. शिरीष, मुलगा डॉ. अश्विन, साक्षीदार डॉ. उमा, सून डॉ. शोनाली व मुलगी सौ. फडके यांचे कॉल डिटेल्स व टॉवर लोकेशन न्यायालयात सादर केले होते.
संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडे पोलिसांनी पत्रव्यवहार करून १ डिसेंबर २०२४ ते २ मे २०२५ या काळातील कॉल डिटेल्सची मागणी पत्राद्वारे केली होती. परंतु, १५ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंतचे कॉल डिटेल्स न्यायालयात सादर केल्याचे दिसून आले. त्यामुळे मनीषा यांनी स्वत:च्या बचावासाठी वकिलांमार्फत नवा अर्ज न्यायालयात दिला.
अर्जातील ठळक मजकूर...
दोषारोपपत्रात नमूद आरोपाप्रमाणे डॉ. शिरीष यांनी डिसेंबर २०२४ पासून रुग्णालयाच्या कामात लक्ष द्यायला सुरवात केली होती. त्यामुळे तेव्हापासून आत्महत्या करेपर्यंत डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील त्यांच्या कुटुंबातील व महत्त्वाचे साक्षीदार आणि १६ ते १८ एप्रिल या काळात डॉ. शिरीष यांना ११ वेळा कॉल करणाऱ्या अनोळखी क्रमांकाचेही डिटेल्स सादर करावे. तसेच आत्महत्या करण्याच्या काही मिनिटांपूर्वी डॉक्टरांना तीनवेळा कॉल करणाऱ्या व्यक्तीचेही पाच महिन्याचे सीडीआर व लोकेशन जतन करून ठेवावे, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.