सोलापूर : राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जासाठी आता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलदवारे (https://www.jansamarth.in) आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. शासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रातून फक्त सोलापूर जिल्ह्याची निवड केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, २ लाखांच्या मर्यादेपर्यंत पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज मिळवता येणार आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे.
आधारकार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, बँक पासबुक व पॅनकार्ड (असल्यास) सोबत असावे. "जनसमर्थ" पोर्टलच्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याकरिता आता बँकेत जाण्याची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होईल. या ऑनलाइन प्रकियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाकडून मोहीम राबविण्यात येईल.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सुविधा मिळणार
या मोहिमेचे वेळापत्रक तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक तालुका प्रतिनिधी यांच्या समन्वयाने तयार करण्यात येईल. सदर अर्ज प्रकियेत सेतू केंद्र, महा ई-सेवा, ग्राहक सेवा केंद्र यांचाही सहभाग घेण्यात येईल. जास्तीत जास्त पात्र व गरजू शेतकऱ्यांनी जनसमर्थ पोर्टलवर पीक कर्ज मागणी अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.