सोलापूर : सोलापूर- मुंबई विमानसेवेतील प्रमुख अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर व्यावहारिक तूट निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास आज (सोमवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुरी देण्यात आली. यामुळे आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोलापुरात रोजगार येण्याकरिता शहरातून मुंबई, बंगळूर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी वारंवार होते. तसेच सोलापूर - मुंबई विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांची अडचण होत होती. उद्योजक सोलापुरात येण्यास तयार असूनही केवळ विमानसेवा नसल्यामुळे यात अडथळे येत होते. मात्र, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हायबिलिटी गॅप फंडिंगला मंजुरी देण्यात आल्याने मुंबईच्या विमानसेवेचा प्रमुख अडथळा दूर झाला आहे.
या निर्णयानुसार सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या हवाई मार्गासाठी स्टार एअर कंपनीस प्रत्येक आसनामागे व्यावहारिक तूट निधी देण्यात येणार आहे. याकरिता १७.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. हा निधी पहिले एक वर्ष देण्यात येणार असून त्यानंतर केंद्र शासनाच्या नियमानुसार २० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. आता सोलापूरकरांना गोवा, मुंबईनंतर तिरुपती, बंगळूर व हैदराबाद शहरासाठी विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
युवा आमदारांची मागणी अन् पालकमंत्र्यांची साथ
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी व देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होण्याची मागणी केली होती. सोलापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई विमानसेवेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे.
व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय?
विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी आणि प्रवाशांअभावी विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून ती बंद होऊ नये याकरिता राज्य शासनाकडून संबंधित विमान कंपनीला प्रत्येक तिकिटामागे देण्यात येणाऱ्या ठराविक रकमेला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हटले जाते.
वर्षभरासाठी मिळणार १०० टक्के तूट
सोलापूर- पुणे- मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रतिआसन व्यावहारिक तूट देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनाने सामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडेल यादृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम) योजना सुरू केली. उडान योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रतिआसन ३,२४० रुपये दराने (शंभर टक्के व्हीजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर- पुणे- मुंबई हवाई प्रवासाचे दर कमी होतील. उडान योजना लागू झाल्यानंतर शासनाकडून हा निधी बंद करण्यात येईल व केंद्र शासनाच्या उडान योजनेप्रमाणे २० टक्के व्यावहारिक तूट देण्यात येणार आहे.