deepali chavan 
महाराष्ट्र बातम्या

सख्यांनो... कायम पुन्हा शून्यात यायची तयारी ठेवा

सकाळ डिजिटल टीम

दीपाली चव्हाण काय किंवा शीतल फाळके काय किंवा आत्महत्या करणारी कोणतीही व्यक्ती काय... अपेक्षाभंगाचे ओझे.. त्यातून आलेली भयाण निराशा.. स्वतःकडून झालेल्या किंवा न झालेल्या चुकांचे खापर इतरांनी फोडले असेल किंवा स्वतःच फोडून घ्यायची सवय, आयुष्यावरच आपले ओझे लादण्याची सवय याची गिचमिड करुन आयुष्याचा चोळामोळा करण्याचा हक्क ना निसर्गाने आपल्याला दिलाय ना कायद्याने दिलाय.  आयुष्य तर आपल्याच गतीने आपल्याच पद्धतीने जात असतें लुडबुड करतो ती आपण स्वतःच... कसली लुडबुड करतो आपण आपल्याच आयुष्यात?  कधी मागे वळून पाहिलंय का?  

मोठे झालो कि किमान शिकलेलो तरी असतोच,जगाचं थोडं व्यवहार ज्ञान आलेलं असतं, त्यात  एखादी नोकरी, पद मिळालं,  लग्न झालं कि मग बोलायलाच नको.. त्यातच एवढे गुरफटतो आपण कि जिथून सुरवात केलीय त्या जागेकडे बघायला एकतर आपल्याला फुरसत तर नसतेच आणि इच्छाही.

जेव्हा लहान होतो, आईबाबांच्या पदराखाली होतो तेव्हा कोण होतो आपण.. शून्य
जेव्हा पाढे घोकत बसायचो, धडे गिरवायचो तेव्हा कोण होतो आपण शून्य..

एखाद्या परीक्षेत नक्कीच मागे पडलेलो होतो, काही गुणांनी हरलेलो होतो तेव्हा पुन्हा शून्यावरच तर आलो होतो. पुन्हा नव्याने सुरवात करायचो. का ? तर शून्याची जागा त्यावेळी आपल्यापासून जवळ होती.. पुन्हा मागे जाऊन उमेदीचा नाव स्पोर्ट्स ड्रेस घालून सज्ज व्हायचो आपण, पण आता खूपच पुढे आलोय आपण, असे नाही का वाटतं तुम्हाला? दिपालीसारख्या मुली त्याच शून्यापासून खूप दूर गेल्या होत्या असं मला ठामपणे वाटतंय. जेव्हा जेव्हा आयुष्यात छोटी किंवा खूप मोठी भली मोठी संकट येतात, जेव्हा आपले नोकरीतील लोकं किंवा त्रास देणारे कोणतेही लोकं  जेव्हा आपल्या मनाच्या आणि  शरीराच्या भक्कमतेभोवती नैराश्याचा आणि अपयशाचा पाश घट्ट आवळायला सुरु करतात तेव्हा त्या पाशापुढे नांगी टाकायची, त्या नैराश्याला कवटाळायचं कि त्यातून सुटका करायची  हे सुचण्याचे सारे मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा काय करायला हवे हे आधी आपल्या मनाला माहिती पाहिजे. न्हवे अशावेळी मी काय करेन याची मानसिक तयारी आधीपासूनच हवी.

मान्य आहे सर्वांनाच अशी तयारी जमेलच असं नाही. पण हेही तितकंच खरं असतं कि आपण आपला अभ्यास, आपलं शिक्षण,  आपली पदवी, आपली नोकरी, आपलं पद प्रतिष्ठा,  आपलं स्थान आपली समाजातील नातेवाइकांमधील प्रतिमा, त्यांचा आपल्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असेल याचा धसका, आपले सहकारी आपल्यामागे काय चर्चा करत असतील, समोर आपल्याला अपमानीत करतील या आभासी गाठोड्यालाच कमरेला बांधून घेतलंय कि त्याला खाली उतारवायलाच तयार नसतो. काय आहे त्या गाठोड्यात? फक्त आयुष्याला आभासी वर्तुळ बनवून त्यात गोलगोल गरागरा फिरवायला लावणारे भोवरे आहेत त्यात. हे समजून घ्या आधी. म्हंटलं तर आहे, म्हंटलं तर काहीच नाही ते आणि हे ओळखायला शिका.

एखादी मोठी व्यक्ती नॉर्मल बोलली, माधुरी, उर्मिला मराठीत बोलली कि आपण कौतुकाने बोलतो किती down to earth आहेत हे लोकं. मग आपणही down to earth का नाही राहत?  का पुन्हा शून्यात नाही जात आपण?  का त्याच नोकरीला, पदाला, स्थानाला कवटाळून बसण्याचा हट्ट धरतो?  सोडायची मानसिकता ठेवा. निदान जेव्हा unlimited  त्रास व्हायला सुरु होतो तेव्हा तरी.. भलीमोठी, सुंदर देखणी मेणबत्ती जेव्हा अग्नीच्या धगेने वितळते, तेव्हा  जमिनीवर वितळून येते शांतपणे.. तसें शांतपणे जमिनीवर या.. मनाला ही खाली उतरू द्या. होणारा, झालेला आणि होऊ घातलेला त्रास, टॉर्चर जरी संपणारे नसले तरी त्याला गिळंकृत करुन त्याची धज्जी उडवण्यासाठी आपल्या काळजाची खोली मोट्ठी करावी लागेल त्यासाठीच जसा फुगा मोठा फुगला नाही कि आपण त्यातील हवा काढून घेतो. आपल्याला लागलेला दम शांत होऊ देतो,  एक मोठ्ठा श्वास घेतो आणि पुन्हा नव्याने फुगा फुगवायला घेतो,तस्संच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची ताकद नेहमी ठेवा. त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांसोबत बोला, मित्र मैत्रिणींसोबत बोला.

आपण आपल्या समस्या समोरच्याला आपल्या माणसांना कसं सांगू असा विचार करत सांगायचं टाळतो आणि नंतर आपल्याला कळत अरे यांच्याकडे होता कि मार्ग.. आधीच सांगितले असतें तर कामच झालं असतं. हे नंतर कळते आपल्याला.. तर आपल्या समस्या जवळच्या जास्तीत जास्त माणसांना सांगा. कधी वाटेल एखाद्याला आनंद होईल मी अडचणीत आहे हे पाहून.. वाटू द्या त्याला तसें, कधी वाटेल हा हितशत्रू असेल का आपला?  अश्या वेळी शंकांचे जाळे विणत बसू नका. शिवाजीमहाराज सर्वसमावेशक होते. त्यांनी सर्वांनाच जवळ केले होते त्यात आपले होते आणि हितशत्रुही होते पण आपल्यांची ताकद,सदिच्छा वरचढ ठरली आणि स्वराज्य उदयाला आले. तसेच नकारात्मक विचार फेकून द्या आणि जेवढे जास्त व्यक्त व्हाल तेवढ्या सदिच्छा, पॉसिटीव्ह वेव्ज आपल्याभोवती जमा होतात आणि त्या खरंच काम करतात..  खुपजण सांगताहेत व्यक्त व्हा.. बरोबर आहे व्यक्त व्हायला हवे पण त्यासाठी कोणी जवळ नसेल, व्यक्त होता येत नसेल तर भक्ती करा.. परमेश्वर एक संकल्पना आहे, देव आहे कि नाही माहिती नाही पण त्याच्या भक्तीत खूप ताकत असतें. तुम्हाला प्रत्येकवेळी व्यक्त नाही होता आलं तर एकटे राहून भक्ती करा...मंत्रोच्चारात भलीमोट्ठी ताकत आहे. म्हणून आधी म्हंटलं तस जेव्हा संकट येईल तेव्हाच भक्ती, धावा करू नका तर नेहमी जसे शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी आपण व्यायाम कसरत करतो तसेंच  मनाच्या आरोग्यासाठी भक्ती करा, मंत्रोच्चार करा, एखाद्या शाळेला भेट द्या. शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहिलेले असतात. ते आत्ता तुम्हाला इतके प्रभावी वाटतील जितके शाळेत असताना वाटले नसतील.  त्यात रस नसेल तर मोठ्याने गाणी म्हणा, छंद जोपासा, मोट्ठ्याने रडा देखील,.(रडण्याची थेरपी हा अजून एक  लेखच लिहिला आहे मी ). या गोष्टी आपण पदावर साम्राज्य करताना क्षुल्लक वाटतात आणि आपण त्यांना वेळ देत नाही,  जोपासत नाही. त्याची शरीराला आणि मनाला असलेली सवय राहत नाही.. आणि मग संकटांचा उद्रेक झाला कि या गोष्टींपासून दूर असल्यामुळे मनाला एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ढिशक्यांवं.. शूट.. कारण दिपालीही व्यक्त झाली होतीच कि तिच्या घरच्यांसोबत.. पण आपण आपले रडगाणं कायमच गात राहत नाही.. आतल्याआत घुसमटत राहतो. स्वतःला एवढे दोष देतो, समोरच्यालाही देत राहतो आणि टोकाचा निर्णय घेतो. तो घेतलाच नाही पाहिजे, पण मग काय करायला पाहिजे? आहे त्या पाशातून आधी स्वतःला मोकळे करा.

नोकरीमुळे त्रास होतोय ना?  मग नोकरी सोडा असे म्हणणार नाही मी,  पण नोकरीला आयुष्यात जे अनन्यसाधारण महत्व देतोय आपण ते आधी खाली आणा. जरा बघा आपल्या घरच्यांना त्यामुळे वेळ दिलेला नसतो आपण. एक सामान्य गृहिणीप्रमाणे शांत संयमी राहून काही दिवस नोकरीतून बाहेर पडा. स्वतःला आधी आपण खास कोणीतरी आहोत हे समजणे बंद करा. दीपालीच्या मानसिकतेत असाल तर आधी स्वतःला रितं करा.. समोरचा टॉर्चर करतोय, अपमान करतोय, खूप अडचणीत आणतोय, आयुष्य उध्वस्त करू पाहतोय, पण त्याच्या शब्दांना आपल्या भक्कमतेवर मात करू देऊ नका.

आपण सिनेमात पाहतो कि गुदमरलेल्या नायिकेला नायक एका  डोंगरावर आणतो आणि तिला मोठ्याने किंचाळायला ओरडायला लावतो.. ज्याचा राग येतोय त्याला शिव्याशाप द्यायला लावतो.. आणि ती जेव्हा असे करते तेव्हाच तिला जाणवते कि आपल्या मनावरचे मोठे ओझे दूर झालेय. भले समस्या मिटलेली नाही पण मनावरचं स्वतःला संपवून टाकू इच्छिणार काळ मळभ दूर झालंय. आता नव्याने लढायची शक्ती तिला मिळालीय असे वाटू लागते तिला. आपण हे दृश्य screen वर मनापासून पाहतो, टाळ्या वाजवतो पण स्वतःही आपण हे केले पाहिजे हे त्या नेमक्या वेळी विसरतो. It works.. हे करुन बघा. छोटे छोटे फंडे आहेत तुटणाऱ्या, फाटणाऱ्या आयुष्याला जोडण्यासाठी.. बस.. नाउमेदीचा क्षण टाळा.... न्हवे टाळलेच पाहिजेत नाहीतर एकतर आपली दीपाली होईल नाहीतर ती गेल्या दिवसापासून संतापलेली, चरफडणारी आपल्यासाख्या स्त्रियांची लाट तयार होईल..म्हणून आता बस्स .. एवढेच सांगणे आहे कि आपल्या लाडक्या संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारल्यानंतर गड सोडून जाता येत असतानाही मोठ्या हिमतीने मुलासह स्वतःला तब्बल 16 वर्षे मुघलांच्या काळ्या छायेत एकदाही न रडता, मोठ्या धीराने, संयमाने आणि इतका मोठा काळ हिमतीने लढवणाऱ्या येसूबाईंसारख्या व्हा. बाकी आयुष्यात हाय काय आणि नाय काय.. सगळं आपल्याच हातात आहे.. सख्यांनो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT