महाराष्ट्र

लाचार होऊन युती नाही- उद्धव ठाकरे

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - ‘‘देशात आजपर्यंत अनेक लाटा आल्या आणि गेल्या. लाटेत ओंडकेही तरंगतात आणि लाट ओसरली की गोटेही शिल्लक राहतात हे लक्षात घ्या, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. आगामी महापालिका निवडणुकीत लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही. युती होईल किंवा नाही मला माहीत नाही. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचा सोहळा गोरेगावच्या एनईसी मैदानामध्ये धूमधडाक्‍यात साजरा करण्यात आला. त्या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. 

छत्रपती शिवराय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला आणि पुन्हा याच मातीत जन्म व्हावा, असे सांगत भावनेलाही यांनी हात घातला. शिवसेना गुंड असती तर पन्नास वर्षे आम्ही टिकलो असतो का? असा सवाल करीत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधकांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे अनेक जण आले आणि गेले. आम्हाला काहीच फरक पडला नाही. आताही शिवसेना संपते कशी, याचा विचार करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, की देशात आजपर्यंत अनेक लाटा आल्या हे खरे असले, तरी या लाटात ओंडकेही तरंगतात. त्यामुळे अशा लाटांना आम्ही घाबरत नाही. नुकत्याच आलेल्या लाटेतही ६३ आमदार शिवसैनिकांनी निवडून आणले होते. हे श्रेय माझे नाही तर कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे लाटांचा विचार न करता लढलेल्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो.’’ 

हार आणि प्रहारही 

आगामी महापालिका निवडणुकीतील युतीबाबत बोलताना ते म्हणाले, की मी युती तोडणार नाही. ती तुटावी अशी इच्छाही नाही; मात्र युतीचा निर्णय मी घेईन, पण तुम्ही तयार राहा. यापूर्वी केलेली युती प्रामाणिक होती. दोन्ही पक्षांत संवाद साधला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधाळतानाच भाजपवर मात्र टीकास्त्र सोडण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. शिवसेना आज पन्नास वर्षांची झाली आहे. त्यापैकी २५ वर्षे भाजपसोबत युती होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली होती. या वेळी होईल का माहीत नाही. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.

दरम्यान, शिवसेनेला खुर्ची मिळाली नाही तरी चालेल; पण जनतेच्या हिताचा कायम विचार केला. खोटी आश्‍वासने आणि भूलथापा शिवसेनेने कधी मारल्या नाहीत, असा टोलाही त्यांनी मोदींना मारला. अलीकडे लोकसभा, विधानसभा निवडणुका का एकत्र व्हाव्यात यासाठीची चर्चा सुरू आहे. कारण परदेशी दौऱ्यांमध्ये या निवडणुकांचा व्यत्यय येतो. प्रचारासाठी त्यांना परत परत भारतात यावं लागतं, अशी टीकाही मोदींच्या परदेशी दौऱ्यावर केली. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यानंतरही काश्‍मीर प्रश्‍न, समान नागरी कायदा, राममंदिर उभारणी वगैरे आपण सगळे विसरून चाललो आहोत, याची आठवण त्यांनी भाजपला या निमित्ताने करून दिली. 

पुन्हा सत्ता आणून दाखवीन 

गेल्या विधानसभा निवडणुकीत वेळेवर युती तुटल्याने वेळ कमी पडला. त्यामुळे ६३ आमदारांच्या वर हा आकडा गेला नाही. वेळ आणखी मिळाला असता, तर वेगळे चित्र दिसले असते. आज राज्यात सत्ता नसली तरी उद्याही मी सत्ता मिळवून देऊ शकतो, असा टोलाही त्यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. 

वाघ एकटात जातो 

गेल्या पन्नास वर्षांतील शिवसेनेचे सिंहावलोकन मीही करतो. मात्र वाघ हा सिंहाप्रमाणे कळपाने जात नाही; तर तो एकटाच जातो आणि लढतोही. वाघ आणि सिंहाची तुलना करून मी उगाच वाद निर्माण करू इच्छित नाही, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना मेळावा क्षणचित्रे

- शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी मेळाव्याचे आयोजन नियोजनबद्ध. 

- लांबवरून आलेल्या प्रत्येक सैनिकाला न्याहरी देण्यात आली.

- एनएसई संकुलातील सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी मान्यवरांनी वेळोवेळी व्यक्‍त केलेल्या उद्‌गारांचे फलक लावण्यात आले होते.

- नितीन बानगुडे पाटील यांचे भाषण हे मेळाव्याचे खास आकर्षण होते. शिवसेना सत्तेत असली, तरी राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर सतत योग्य तेथे विरोध नोंदवत राहतील असेही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नमूद केले.

- नाटककार गंगाराम गवाणकर यांनी चित्रसंदेशात शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत येईल, असे नमूद करताच सभागृहात जल्लोष झाला.

राज्याभिषेकाचा नयनरम्य सोहळा 

सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सोहळा भव्य करण्यासाठी शिवसेनेने मराठी संस्कृतीचा महिमा दाखविणारे सुंदर सादरीकरण केले. या मेळाव्यात शिवराज्याभिषेकाचा सुंदर प्रसंग सादर केला गेला. रंगभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत गाजणारे शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे घोड्यावर बसून सभागृहात अवतरले.

लतादीदी, बाबासाहेबांच्या शुभेच्छा 

पन्नासाव्या वर्धापनदिनानिमित्त भारतरत्न लता मंगेशकर, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पक्षाला दिलेल्या शुभेच्छा मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आल्या. शंकर महादेवन यांनी ‘नमो शिवाजी राजा’चे गायन केले.

श्रद्धांजली 

कार्यक्रमाला प्रारंभ झाला तो शिवसेनेच्या वाढीसाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून. सामना या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करीत शिवसेनावाढीसाठी प्राण देणाऱ्या सैनिकांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांची नावे नमूद करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अमिताभ यांनी जागवल्या आठवणी 

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींचा पटच शुभेच्छातून व्यक्‍त केला. बाळासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष आता जनतेला सावली देत असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी व्यक्‍त केले. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने दिलेल्या शुभेच्छाही मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT