तात्या लांडगे
सोलापूर : शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला, एक किंवा दोन अवयव निकामे झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून दोन लाखांपर्यंत अर्थसाहाय्य मिळते. त्यानुसार यावर्षी पात्र ठरलेल्या एक हजार ३७२ मृत शेतकऱ्यांसह अपंगत्वप्राप्त २७ शेतकरी कुटुंबीयांसाठी २७ कोटी ७६ लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी कृषी विभागाने केली आहे. मात्र, योजनेसाठी निधी नसल्याने त्या कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १५८ शेतकरी कुटुंबीय आहेत.
शेती करताना अनेकदा अपघात होतात, कधी वीज पडते, कधी पूर येतो, अतिवृष्टी होते तर कधी सर्पदंश किंवा विंचूदंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. यावेळी अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा कायमचे अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि अडचणी येतात.
अशा अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. त्यानुसार गतवर्षी प्रस्ताव पाठविलेल्या शेतकरी कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी मदत मिळाली आहे. पण, चालू वर्षातील शेतकरी कुटुंबीयांना सरकारकडून निधी मिळालेला नाही. मदतीसाठी मृत व कायमचे अपंगत्वप्राप्त शेतकरी कुटुंबीय सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
१३ जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू
राज्य सरकारच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून दोन लाखांचे अर्थसाहाय्य मिळावे म्हणून कृषी विभागाकडे राज्यभरातून मृत शेतकऱ्यांच्या तीन हजार ४०८ कुटुंबीयांनी प्रस्ताव सादर केले. त्यात १३ जिल्ह्यांमधून सर्वाधिक प्रस्ताव प्राप्त झाले होते. सोलापूर जिल्ह्यातून १५८, नाशिकमधून १४३, अहिल्यानगरमधून १४५, पुण्यातून १३१, जालन्यातून २८०, साताऱ्यातून १५४, सांगलीतून १६९, कोल्हापूरमधून २०१, छत्रपती संभाजीनगरातून २१७, बीडमधून २२१, नांदेडमधून १७१, बुलढाण्यातून १०३ आणि चंद्रपूरमधील १२१ शेतकरी कुटुंबांचा त्यात समावेश आहे.
योजनेची यंदाची राज्याची सद्य:स्थिती...
मृत शेतकरी कुटुंबीयांचे प्रस्ताव
३,४०८
पडताळणीअंती पात्र प्रस्ताव
१,३७२
अपंगत्वाचे एकूण प्रस्ताव
६४
पात्र ठरलेले प्रस्ताव
२७
निधीची मागणी
२७.७६ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.