पिंपरी : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीमुळे देशात परिवर्तन होत आहे. जाती-धर्म वेगवेगळे असले तरी, संस्कृती एक आहे. त्यामुळे नाव, गाव, जात, धर्मापेक्षा देश मोठा आहे, हे विसरून चालणार नाही,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. तसेच ज्यांना सत्ता हवी आहे त्यांनी माझ्याकडे यावे, सत्ता मिळवण्यासाठी केवळ महायुती हाच पर्याय, असेही ते म्हणाले.
महापालिकेतर्फे पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे उद्घाटन आणि माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या कामाचा आठवले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. महापौर राहुल जाधव, आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, आमदार महेश लांडगे, खासदार अमर साबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
आठवले म्हणाले, "बाबासाहेबांचे देशासाठीचे योगदान मोठे आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार जातीय व्यवस्था मोडली पाहिजे. कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य व कोणता धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे. आमिष दाखवून किंवा बळाचा वापर करून धर्मांतर करू नये. देहूरोड येथील विहाराच्या विकासासाठी सरकारने तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणखी आठ-दहा कोटी रुपये मंजूर करून चांगल्या पद्धतीने विकास केला जाईल.''
अण्णा भाऊंबद्दल आदर
निगडीत महिन्यांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप रामदास आठवले यांच्यावर झाला होता. त्याबाबत ते म्हणाले, "अण्णा भाऊंचा मला आदर आहे. त्यांच्याबद्दल मी बोललो नव्हतो. ते वक्तव्य तरुणांना उद्देशून होते. त्याला लोकनाट्याचा संदर्भ होता. परंतु, काहींनी त्याचा विपर्यास केला, याचा खेद वाटतो.''
अशी आहे भीमसृष्टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी प्रकल्प उभारण्याचे काम मार्च 2016 मध्ये सुरू झाले. यासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च आला आहे. दोन हजार 363 चौरस मीटर क्षेत्रावर भीमसृष्टी असून, त्यात डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर ब्रॉंझचे 19 म्युरल्स उभारले आहेत. चित्रांसह त्याची माहिती दिली आहे. आकर्षक कारंजे, प्रकाश योजना, लॅंडस्केप व उद्यान विकसित केले आहे.
जम्मू-कश्मीर शांत
केंद्र सरकारने राज्यघटनेतील 370 आणि 35 ए कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आहे. येत्या पाच वर्षांत तिथे विकास दिसू लागेल, असे सांगून आठवले यांनी चारोळी सादर केली. ते म्हणाले, "जम्मू- काश्मीरमध्ये मारू शकत नाही कुणी पत्थर, कारण आम्ही रद्द केलंय कलम तीनशे सत्तर.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.