तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेले विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची तक्रार पायलटने बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगितले, तरीही परिसरात पतंग उडविणे सुरूच होते. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) दिवसभर एमआयडीसी पोलिस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेत होते. तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडविणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विमानसेवेला प्रामुख्याने मोकाट जनावरे, पक्षी, ड्रोन, पतंग अशा गोष्टी अडथळा ठरतात. त्यामुळे विमानतळ परिसरात कत्तलखाने, कचराडेपो, चिकन-मटण विक्री दुकानांना परवानगी नसते. तरीही, बुधवारी (ता. ५) सोलापूर विमानतळाजवळच मुलांनी उडविलेल्या पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यातच अडकला. पायलटला लगेच त्याचे इंडिकेशन मिळाले. त्याने विमानतळ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. विमान सुरक्षित उतरले, पण अधिकाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना त्यासंदर्भातील माहिती दिली.
पोलिसांनी नई जिंदगी परिसरातील एका मांजा विक्रेत्यावर आणि एका अल्पवयीन मुलाच्या पालकावर कारवाई केली होती. मात्र, विमान मुंबईला रवाना झाल्यानंतर परिसरात पतंग उडताना दिसत होते. त्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्याबद्दल सांगितले. त्यामुळे गुरुवारी दिवसभर स्वत: वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्यांच्या अंमलदारांसह नई जिंदगी परिसरात मांजा विक्री करणाऱ्यांसह पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई केली.
आता आठ दिवस सतत कारवाई
मांजा पंख्यात अडकल्याची तक्रार पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. आता पुढील आठ दिवस सतत दिवसभर नई जिंदगी परिसरात पोलिसांची गस्त राहणार आहे. मांजा विक्रेता, पतंग उडविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली.
विमान लॅण्ड करताना वाजवावे लागतात फटाके
विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत उंच घरे असल्याने त्यावरून मोकाट कुत्री आत येतात. क्रिकेट खेळताना बॉल विमानतळ परिसरात आला की तार कापून मुले आत येतात. पतंगाच्या बाबतीतही असेच आहे. काहीजण विनापरवाना ड्रोन उडवतात. परिसरातील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांमुळे विमानतळ परिसरात पक्षी दिसतात. कचरा भिंतीलगत टाकल्याने मोकाट कुत्री आत येतात. त्यामुळे विमान लॅण्ड होण्यापूर्वी किंवा उतरण्यापूर्वी मोठ्या आवाजाचे फटाके वाजवावे लागतात. त्यासाठी स्वतंत्र लोक ठेवल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.