सोलापूर : भाजपच्या अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस व पंढरपूर- मंगळवेढा या पाच मतदारसंघांतील उमेदवारांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत चार लाख ८३ हजार १२२ मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊनही २०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मतदान तब्बल एक लाख ३२ हजार ८५९ मतांनी वाढल्याचे दिसून आले. त्यात लाडक्या बहिणींची साथ मोलाची अन् निर्णायक ठरली आहे. लेक लाडकी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अव्वल ठरलेल्या खासदार प्रणिती शिंदेंचा शहर मध्य मतदारसंघ म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने काबिज केला आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून प्रणिती शिंदे सलग तीनवेळा आमदार झाल्या. लोकसभा निवडणूक जिंकल्यावर काँग्रेस हा बालेकिल्ला राखणार का? याची सर्वांनाच उत्सुकता होती. मोठ्या मताधिक्याने प्रणिती शिंदे खासदार झाल्याने त्या शहर मध्यचा बालेकिल्ला राखतील, असा विश्वास अनेकांना होता; मात्र मोची, मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेस नेतृत्वाला भाजपने चांगलाच धडा शिकवला.
महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला येणारा हा मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपने स्वत:कडे घेतला. त्यांचा पहिलाच उमेदवार येथून विजयी झाला. या मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी उमेदवाराने एक लाखावर मते घेतली आहेत. विशेष बाब म्हणजे, देवेंद्र कोठेंनी एक लाखावर मते घेत पहिल्याच निवडणुकीत आमदारकीची लढाई जिंकली. ज्या मतदारसंघाच्या आमदाराने लोकसभेला भाजपच्या उमेदवाराला धुळ चारली, त्याच प्रणिती शिंदेंचा विधानसभा मतदारसंघ भाजपने मिळवला आहे.
एमआयएमचे वाढले मतदान
२०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून एमआयएमच्या उमेदवाराने जास्तीत जास्त ३९ हजारांपर्यंतच मते घेतली होती. पण, २०२४च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार फारुक शाब्दी यांनी तब्बल ६१ हजार ४२८ मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेस उमेदवारापेक्षाही शाब्दी यांनी अधिक मते घेतली आहेत. दुसरी विशेष बाब म्हणजे, २०१४ च्या निवडणुकीत विजयी उमेदवार प्रणिती शिंदेंना अवघ्या ४६ हजार ९०७ मतांवर विजय मिळाला होता. तर २०१९च्या निवडणुकीत ५१ हजार ४४० मतांवर विजय मिळाला होता. फारुक शाब्दी यांना यापेक्षा अधिक मते मिळूनही त्यांना या निवडणुकीत विजय मिळालेला नाही, हे विशेष. प्रणिती शिंदे उमेदवार नसल्याने बहुतेक मतदारांनी कोठेंनाच पसंती दिल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.