residenational photo
residenational photo 
महाराष्ट्र

कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब' :डॉ.सुभाष भामरे

महेंद्र महाजन

नाशिक ः संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब' होईल, असे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे सांगितले. राज्यात "डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल शुक्रवारी (ता. 15) चर्चासत्र होत आहे. त्यासंदर्भात माहिती देताना डॉ. भामरे बोलत होते. 

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाचे सार्वजनिक उद्योग, स्टार्ट-अप, वैयक्तिक इनोव्हेटस्‌, संशोधन अन्‌ विकास संस्थांसाठी संरक्षण इनोव्हेशन हबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. संरक्षणविषयक उत्पादनांशी निगडीत नसलेल्या लघु उद्योगांना देखील त्याचा लाभ होईल. संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्राशी निगडीत उद्योगांमधून 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होते. उरलेले "आऊट सोर्स' करण्यात येते. त्यादृष्टीने छोटे उद्योजक तयार व्हायला हवेत अशा दृष्टीने संरक्षण "इको सिस्टीम'चे धोरण केंद्र सरकारने स्विकारले आहे.

इनोव्हेशन हबसाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करुन दिला जातो. जेणेकरुन संशोधन अन्‌ विकासातून पुढे येणाऱ्या बाबी भारतीय संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील. सरकारने डीफ एक्‍स्पो 2018 मध्ये "इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्‍सलन्स' योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. योजनेसाठी "डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून "ना नफा ना तोटा' तत्वावर निधी उपलब्ध करुन दिला जातो. ऑर्गनायझेशनसाठी एच. ए. एल. ने 100 कोटी आणि बी. ई. एल. ने 50 कोटींचा निधी उभारला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

चर्चासत्रात दोन शुभारंभ 
खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याची गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सीज (आऊट सोर्सिंग ऑफ क्वॉलिटी ऍश्‍युरन्स फंक्‍शन फॉर डिफेन्स स्टोअर्स मॅन्युफॅक्‍चरड बाय प्रायव्हेट इंडस्ट्रीज टू थर्ड पार्टी इन्स्पेक्‍शन एजन्सीज) आणि व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणाली (ट्रेड रिसिव्हेएबल्स डिस्कॉन्टिंग सिस्टीम) याचा शुभारंभ नाशिकमधील चर्चासत्रात होईल, असे सांगून डॉ. भामरे म्हणाले, की देशात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनवण्याची भूमिका केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने स्विकारली आहे. त्यातंर्गत महाराष्ट्रात नाशिकमध्ये "डिफेन्स हब' होण्याची क्षमता आहे. त्यासाठी पूरक ठरेल असा उपक्रम पहिल्यांदा नाशिकमध्ये राबवण्यात येत आहे.

सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्‍चरर्स, भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सी. आय. आय. तर्फे शुक्रवारी (ता. 15) दिवसभर हॉटेल एमरॉल्ड पार्कमध्ये संरक्षण व संरक्षण हवाई उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी संधी याविषयावर चर्चासत्र होत आहे. चर्चासत्रात देशाच्या संरक्षण विभागातील नौदल, लष्कर, हवाईदल या विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी, टाटा, महिंद्रा, किर्लोस्कर, भारत फोर्ज अशा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ऑर्डीनन्स फॅक्‍टरी बोर्ड, संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान, डायरेक्‍टर जनरल ऑफ क्वॉलिटी ऍश्‍युरन्स, एअर क्‍वॉलिटी ऍश्‍युरन्स, एच. ए. एल., जी. एस. एल. अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. "निमा', "आयमा', महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, लघु उद्योग भारती आदी संघटनांचा सहभाग असेल. संरक्षण क्षेत्राशी निगडीत व्हेंडरशीप विकासाच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमातून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. 

संवाद साधणारे तज्ज्ञ 
सी. आय. आय. चे पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष पिरुझ खामबत्ता, संरक्षण मंत्रालयातर्फे सहसचिव संजय जाजू, इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्‍चरर्सचे महासंचालक लेफ्टनंट (निवृत्त) जनरल सुब्रता साहा, अध्यक्ष तथा भारत फोर्जचे व्यवस्थापकीय संचालक-अध्यक्ष बाबा कल्याणी, हवाई दलाचे एअर मार्शल एस. बी. देव, लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू, राज्याचे लघु व मध्यम उद्योगाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, पालकमंत्री गिरीश महाजन, किर्लोस्कर पंपचे प्रकल्प प्रमुख सुनील बापट, आर्टिलरी स्कूलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारिया, नौदलाचे रिअर ऍडमिरल संजय वस्त्यायन, हवाई दलाचे एअर व्हाईस मार्शल बी. आर. कृष्णा, किर्लोस्कर न्युमॅटीक कंपनीचे अध्यक्ष राहूल किर्लोस्कर, एच. ए. एल. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष एस. पी. शुक्‍ला, लष्कराचे मेजर जनरल शंतनू दयाळ, नौदलाचे रिअर ऍडमिरल राजाराम स्वामीनाथन्‌, हवाई दलाचे अतिविशिष्ट सेवापदक विजेते बी. के. सूद, माझगाव डॉकचे सरव्यवस्थापक डॉ. जे. एम. जांगीर, टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष व्ही. एस. नोरोन्हा आदी उपस्थितांशी संवाद साधतील. 

डॉ. प्रशांत पाटील यांचा पाठपुरावा 
नाशिकमध्ये अस्थीरोग तज्ज्ञ म्हणून रुग्णसेवेत असलेले डॉ. प्रशांत पाटील यांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी म्हणून संरक्षण विषयक उत्पादन क्षेत्रासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु केला आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणून नाशिकमध्ये हे चर्चासत्र होत आहे. छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. नाशिक आणि नगरमधील उद्योजकांना मुंबई आणि पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख उद्योगांच्या पुरवठा साखळीत एकत्रित करण्याच्यादृष्टीने हे पाऊल टाकण्यात आल्याचेही डॉ. भामरे यांनी म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT