मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यावरून राज्यातील राजकारण चांगल तापल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजता उरकला त्यावरूनही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलय.
राज ठाकरेंनी ट्विटर वरुन एक पत्र शेअर करत, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला हवा , असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पत्रात नेमकं काय ?
आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खर तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हव होत आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.
मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं ह्या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची ह्या विषयावरची व्याख्यानं युट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की ह्या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कोणाला माहित नाही.
माझे तर म्हणणं आहे की आता जे नवं शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.
पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं बोललं का जात नसेल? अर्थात 'रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं, त्यामुळे हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या ह्याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्देव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.
बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजा कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष सभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजा कार ह्या दोघांचा बंदोबस्त करेलच, असो, आजच्या मुक्ती संग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा आणि माझं मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचं विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.