सोलापूर : उपमहापौर पदावर बसलेल्या नेत्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. उपमहापौर झाल्यानंतर पुन्हा निवडणुकीत यश मिळत नाही. उपमहापौर पदाची खुर्ची ही राजकीयदृष्ट्या शापित असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेमुळे नवखे नगरसेवकही या पदापासून दूर राहत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये एकीकडे महापौर, स्थायी समिती, सभागृह नेते आणि गटनेते पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे.
दुसरीकडे मात्र उपमहापौर पदाचा पर्याय कोणालाही नको आहे, असे एकंदरीत वातावरण आहे. यापूर्वीचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, शशिकला बत्तूल, राजेश काळे यांच्यासह अनेकांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर दिलीप कोल्हे आणि पद्माकर काळे यांनी तर पक्ष बदलूनही भाजपच्या लाटेतही यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या शापित खुर्चीबद्दलच्या चर्चेवर अनेकांची ‘श्रद्धा’ आणखीच बळकट झाली आहे. पद नाही दिले तरी चालेल, पण उपमहापौर पदाची माळ गळ्यात नको, असा एकच सूर नगरसेवकांमध्ये ऐकायला मिळत आहे.
‘एमआयएम’ला विरोधी पक्षनेतापद मिळणार नाही, पण...
महापौर निवडीच्या सभेची तारीख विभागीय आयुक्तांकडून निश्चित केली जाते. गॅझेट तथा राजपत्रात नगरसेवकांची नावे प्रसिद्ध झाल्यापासून सात ते ३० दिवसांत सभा घेणे आवश्यक आहे. दरम्यान, सोलापूर महापालिकेत भाजपला ८७ तर एमआयएमला आठ जागांवर यश मिळाले आहे. एमआयएमला विरोधी पक्षनेता होण्याची संधी द्यायची की नाही हे महापौरांच्या हाती आहे. महापौर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पहिल्या सभेची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. नियमांनुसार जानेवारीअखेरपर्यंत निवड प्रक्रिया शक्य असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून सभागृहात येण्यासाठी दहा टक्क्यांप्रमाणे विरोधकांची सदस्य संख्या ११ इतकी असणे आवश्यक आहे. ही सदस्य संख्या एकाच पक्षाची असणे बंधनकारक आहे. परंतु, नगरसेवकांची संख्या दहा टक्क्यांप्रमाणे नसेल तर महापौरांच्या अधिकारांतर्गत ज्या विरोधीपक्षांचे संख्याबळ अधिक आहे, त्यांना विरोधी पक्ष म्हणून सभागृहात घोषित केले जाऊ शकते.
बॉम्बे म्युनिसिपल ॲक्ट काय सांगतो...
१९-अ-नुसार विरोधी पक्षनेते पद (१) जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा नेता असेल आणि महापौराकडून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल, तो विरोधी पक्ष नेता असेल.
स्पष्टीकरण ः जेव्हा एकसमान संख्याबळ असलेले दोन किंवा अधिक विरोधी पक्ष असतील तेव्हा महापौर, पक्षाचा दर्जा लक्षात घेऊन अशा पक्षांमधून कोणत्याही एका पक्षातील नेत्याला विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देईल.
(२) विरोधी पक्ष नेत्याला, मानधन, भत्ते व इतर सुविधा देण्याबाबत महानगरपालिकेने केलेल्या नियमांद्वारे तरतूद करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.