Asaduddin Owaisi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Asaduddin Owaisi: मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यात मोदींचा विरोध, ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Asaduddin Owaisi: ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. ‘‘देशाच्या प्रमुखाने धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी विधाने करणे हे कल्पनेपलीकडचे आहे,’’ असे म्हणत ओवेसींनी सकाळशी बातचीत करताना पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

हैदराबाद : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लिम समाजाला अप्रगत आणि इतर समाजापासून वेगळे ठेवायचे असून मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात येण्यास त्यांचा कमालीचा विरोध आहे,’’ असा आरोप करत ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. ‘‘देशाच्या प्रमुखाने धर्माच्या आधारावर भेदभाव करणारी विधाने करणे हे कल्पनेपलीकडचे आहे,’’ असे म्हणत ओवेसींनी सकाळशी बातचीत करताना पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

प्रश्न : भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये तुमच्या समोर मोठे आव्हान उभे केले आहे असे वाटते का?

ओवेसी : मोठे आव्हान वगैरे काही नाही. भाजप कायम मला आव्हान देत असतो. तो त्यांचा हक्क आहे पण ते त्यांची शक्ती वाया घालवतात. ‘एमआयएम’ने १९८४ पासून २०१९पर्यंत कायमच हे आव्हान परतवले आहे. २०२४ मध्येही परतवू. हे नवे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील राष्ट्रीय मुस्लिम मंच या संस्थेने पुढे आणले आहे. यावेळी उमेदवार उच्चवर्णीय असल्याने माध्यमे त्यांना जास्त प्रसिद्धी देत आहेत. आम्ही या आव्हानालाही तोंड देऊ.

प्रश्न : मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचा दर अन्य धर्मीयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे, त्यावर मत काय?

ओवेसी : कुठे आहे अशी माहिती देणारा कागद? आधी मला तो कागद दाखवा. सत्यता पडताळू द्या मग मी उत्तर देतो. याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. खरे तर पंतप्रधानांचे कर्तव्य असते सर्व भारतीयांना समान वागणूक देणे पण पंतप्रधान विद्वेषच पसरवत आहेत. पूर्वीही ते भेदाचे ,ध्रुवीकरणाचे राजकारण करायचे पण या वेळी त्यांनी प्रचार फारच खालच्या पातळीला नेला आहे. मागील दहा वर्षांत सरकारकडून कोणतेही ठोस काम न झाल्याने सत्ताधाऱ्यांचे गरळ ओकणे सुरू आहे. १४ लाख मुस्लिमांना घुसखोर जिहादी ठरवत लक्ष्य केले जाते आहे. अजान असो की हिजाब आमची प्रत्येक ओळख ही राष्ट्रीय सुरक्षेसमोरचे आव्हान असल्याचे चित्र उभे केले जात आहे.

प्रश्न : तुम्हीही ध्रुवीकरण करता, एका दुकानासमोर जाऊन ‘काटते रहो’ म्हणालात

ओवेसी : निवडणूक रोख्यांमध्ये कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सत्ताधारी पक्षाला वास्तवाचे भान यावे यासाठी मी ते केले. मटणाच्या दुकानातल्या कुरेशीला दिवसाला ३०० रुपयेही मिळत नाही आणि महाशक्ती बनण्याच्या कसल्या गप्पा सुरू आहेत.

प्रश्न : मुस्लिमांना देशातील सर्व योजनांचा लाभ होतो, तो पंतप्रधानांनी थोडीच रोखला आहे?

ओवेसी : या योजनांचे लाभ देऊन उपकार करत आहेत का? हा देश इथे राहणाऱ्या प्रत्येकाचा आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने योजनांवरील खर्चात कपात केली असल्याचे आकडेवारी तपासल्यास तुमच्या लक्षात येईल. हे लोक नवव्या वर्गापासून मुस्लिम मुलांना मोफत शिक्षण द्यायच्या गोष्टी करतात पण मुस्लिम मुलगा गरिबीमुळे तिसरी चौथीतच शिक्षण सोडतो. त्याने तिथेच अडकावे यासाठीच तर मोफत शिक्षण नववीपासून केले आहे.

प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे, त्याबद्दल काय सांगाल?

ओवेसी : मुद्दाम सुरू आहे हे सर्व. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधील राज्य सरकारांनी आरक्षण दिले तर त्यावर टीका केली जात असून त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण दिले होते. तो निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरवला होता पण न्यायालयाचाही आदर केला गेला नाही.

प्रश्न : मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नये, असे म्हटले जात आहे. मग मुस्लिमांना आरक्षण मिळावे असे तुम्हाला का वाटते?

ओवेसी : कारण या समाजातील जनता अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे म्हणून. प्रतिकूलतेत शिकणाऱ्या हुशार मुलांना शिष्यवृत्ती मिळाली तर ते चांगले शिक्षण घेतील, त्यांना नोकरी मिळू शकेल आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळेल. पण पंतप्रधान मोदींना, अमित शहांना आणि भाजपला हे लक्षातच घ्यायचे नाहीये.

प्रश्न : यावेळी आपण थेट पंतप्रधानांना लक्ष्य करता आहात. पूर्वी असे नसायचे.‘एमआयएम’ला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असत?

ओवेसी : देशातल्या सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समाजाला जिहादी आणि घुसखोर म्हणणाऱ्या पक्षाची, आम्ही बी टीम असू शकत नाही.

प्रश्न : गेल्या वेळी तुम्ही टीआरएसला पाठिंबा दिला होतात ,या वेळी नाही, असे का? तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार आहात?

ओवेसी : नाही! आम्हाला कुणालाही पाठिंबा द्यायचा नाही. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना आम्ही सांगितले आहे की तुम्ही पाच वर्षे राज्य करा. अडचण आली तर आम्ही आहोत. मोदींना थोपविणे गरजेचे आहे. देश एका विचाराने चालू शकत नाही. आम्ही हैदराबाद जिंकतो आहोतच, अन महाराष्ट्रातले औरंगाबादही. आम्ही प्रकाश आंबेडकरांनाही अकोल्यात पाठिंबा दिला आहे.

प्रश्न : भाजप २७० जागा जिंकणार नाही असे भाकीत केले जात आहे. तसे झाले तर तुमचा निर्णय काय असेल?

ओवेसी : हे तेव्हाचे तेव्हा ठरवू अल्पसंख्याकांची प्रगती, तेलंगणमध्ये ‘आयटी’ उद्योगांचे जाळे उभारणे याची सध्या गरज असून आम्ही त्यासाठी काम करू. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेतल्यानेच देशाची प्रगती होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT