तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमधील अर्धा ते दीड लाखांपर्यंत शेतकरी बॅंकांचे थकबाकीदार असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यसरकार अडचणीतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेल, या आशेने शेतकरी थकबाकी भरायला बॅंकांकडे फिरकत नसल्याने बॅंकांनी त्या शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत.
महायुती सत्तेत आल्यावर बळीराजाचा सातबारा कोरा करू, अशी ग्वाही विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत दिली होती. त्यानंतर शिवसेनेसह काँग्रेस नेत्यांनीही जाहीरनाम्यात ते वचन दिले होते. नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आशा होती आणि त्यामुळे त्यांनी बॅंकांकडून घेतलेले पीककर्ज व मुदत कर्ज भरलेच नाही. आता राज्यातील बॅंकांचे २१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे ३२ हजार कोटींची थकबाकी झाली आहे.
दुसरीकडे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी देखील आता थकबाकीत जात आहेत. बॅंकेचे कर्ज थकल्यावर पुन्हा त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना ‘सिबिल स्कोअर’ पाहू नये, असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र, बॅंकांमध्ये त्याचे पालन होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात आणि अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक या विभागात त्याचे सर्वाधिक प्रमाण आहे.
जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी व थकबाकी
जिल्हा एकूण शेतकरी थकबाकीदार थकबाकी
बीड ५,२६,१२० १,३८,५२८ १२०१ कोटी
जालना ४,२३,८२६ १,५५,९५६ १७४४ कोटी
धुळे १,७९,३७३ ५६,६११ १६० कोटी
वर्धा २,३१,३८० ७२,३७९ ९१३ कोटी
यवतमाळ ३,७४,६१९ १,०३,८२२ २२५६ कोटी
परभणी ४,१८,१६१ १,२७,७५९ १२४९ कोटी
हिंगोली २,३६,७३६ ६६,६१२ ५८२ कोटी
नंदूरबार ९३,०९३ २५,६४१ ३८८ कोटी
बुलडाणा ५,०७,२६३ १,३८,५२८ १२०१ कोटी
गोंदिया १,३६,६५२ ३३,१४३ १६० कोटी
नांदेड ४,९६,४१९ १,१३,२७६ १०५२ कोटी
अमरावती ३,६६,४७९ ७९,३३३ ९२८ कोटी
धाराशिव २,३९,३८० ४४,९५१ १०३७ कोटी
अकोला २,२७,६७७ ४१,८०१ ३४७ कोटी
छ.संभाजीनगर ५,६७,०९२ ९१,५६७ १४६३ कोटी
सोलापूर ८,०३,११० ८५,३९५ २६८१ कोटी
‘या’ १९ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या रिपोर्टनुसार राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, बीड, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, अकोला, छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमधील किमान ५० हजार ते दीड लाख शेतकरी सध्या थकबाकीत आहेत. कर्जमाफीच्या आशेवरील २१ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे खासगी सावकारांकडून जादा व्याजदराने व शेती, जागा, घर गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
बॅंकांची नियमानुसार कार्यवाही
कर्जमाफीच्या आशेने शेतकरी बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. नियमानुसार कर्ज थकबाकीत गेल्यावर त्याच्या वसुलीची कायदेशीर कार्यवाही सर्व बॅंकांकडून केली जाते.
- राम वाखरडे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.