महाराष्ट्रातही पश्चिम बंगालसारखी अशांतता पसरविण्याचा काही जणांचा प्रयत्न असून तो होताकामा नये, असेही नाना पटोले म्हणाले
नांदेड: काँग्रेसच्या विचारांचे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळेच पक्षातर्फे संघटना बांधणीचे काम सुरू आहे. राज्यात आगामी काळात काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष बनणार आहे. त्यावेळी कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असे मत या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. २४) येथे व्यक्त केले. त्यांनी केंद्रावर टीका केली. कॉंग्रेसतर्फे येथे ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमातंर्गत स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दुपारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, माजी मंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.
नव्या पिढीला स्वातंत्र्याची माहिती व्हावी, या दृष्टीने कॉंग्रेसतर्फे ‘व्यर्थ न हो बलिदान’ हा कार्यक्रम राज्यभर घेतला जात आहे. विभागीय पातळीवर हे कार्यक्रम झाले असून आता जिल्हा पातळीवर घेतले जाणार आहेत. भाजपने देशच विकायला काढला आहे. त्यामुळेच काँग्रेसने ही चळवळ सुरू केली आहे. देशाचा जीडीपी आणि आर्थिक स्तर बिघडत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. तिरंगा ध्वजाचा अपमान होतो आहे. तिरंग्याचा अपमान हा देशद्रोहच आहे. भाजप आणि संघ एकच आहेत, असे पटोले म्हणाले.
मराठवाड्यातील महसूल विभागाच्या पुर्नरचनेच्या प्रश्नावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही बोलण्याआधीच पालकमंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख यांनी बोलावे, अशी पत्रकारांची मागणी होती. महाविकास आघाडीचे सरकार असून आम्ही सर्वजण एकत्र बसून हा प्रश्न सोडवू, असे चव्हाण यांनी सांगितले. प्रदेश प्रभारी पाटील यांनी सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. प्रसारमाध्यमे, न्यायालय, सीबीआय, ईडी यासह अनेक संस्थांवर मोदी सरकार बंधने आणू पाहत आहे. सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असून याबाबत युवा नेते राहुल गांधी यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला सर्वसामान्यांचा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘राणेंचे वक्तव्य ही राज्याची संस्कृती नाही’-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राणेंची वाक्यरचना ऐकल्यानंतरच कॉँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाही दिला गेला नाही. याबाबत योग्य आणि कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पश्चिम बंगालसारखी अशांतता पसरविण्याचा काही जणांचा प्रयत्न असून तो होताकामा नये, असेही नाना पटोले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.