Narendra Modi
Narendra Modi 
महाराष्ट्र

जिंकेपर्यंत लढाई थांबणार नाही : मोदी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : 'बँकेत पैसे जमा केल्यानंतर आपले काम झाले, असे काळा पैसावाल्यांना वाटले. पण बँकेत पैसे जमा झाल्यावरच खरे काम सुरू झाले आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला 50 दिवस त्रास सहन करावा लागेल. 50 दिवसांनंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल आणि बेईमानांना होणारा त्रास वाढू लागेल. भ्रष्टाचाराविरोधात आपण जिंकत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही,' असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) दिला. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईतील विविध विकासकामांचीही सुरवात करण्यात आली.

नोटाबंदीवरून संसदेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. तसेच, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी या नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक आघाडी उघडली आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे निमित्त साधत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "निवडणूक जिंकली, तर तुम्ही चांगले काम करत आहात असे मानले जाते. निवडणुकीत पराभव झाला, तर तुमचा निर्णय चुकीचा होता, असे मानले जाते. भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेत 8 नोव्हेंबर रोजी आम्ही निर्णायक लढाईचा बिगूल वाजविला. देशातील सर्व जनतेला या निर्णयाचा त्रास झाला, कष्टही घ्यावे लागले; पण त्यांनी सरकारची साथ सोडली नाही. महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपला साथ देत जनतेने या निर्णयाला असलेला पाठिंबाच दाखवून दिला. विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण देशाच्या भल्यासाठी जनतेने या निर्णयाचे समर्थन केले. ही लढाई सोपी नाही. 70 वर्षे मलई खाणारे तगडे विरोधक नोटाबंदीचा निर्णय अपयशी ठरवा, म्हणून ताकद पणाला लावत आहेत. पण देशवासीयांच्या संकल्पासमोर ही मूठभर मंडळी जिंकू शकत नाहीत. हा देश कधीही पराभूत होऊ शकत नाही. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईनंतर देश बलू शकतो.. देश बदलणार आहे आणि जगासमोर ताठ मानेने आपण उभे राहणार आहोत. जगाला हेवा वाटेल, असा भारत देश आपल्याला घडवायचा आहे. आपण जिंकत नाही, तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयातून काही आडमार्ग निघू शकेल, अशी अजूनही काही जणांना आशा आहे. पण सरकार बदलले आहे, हे त्यांनी नीट ओळखले पाहिजे. देशाचे नियम पाळा आणि सर्वसामान्य नागरिकांसारखे सुखाचे जीवन जगा, असा माझा काळा पैसावाल्यांना संदेश आहे. बेईमानांच्या वाईटाचा काळ सुरू झाला आहे. हे देशाच्या स्वच्छतेसाठीचे अभियान आहे.''

छत्रपती शिवराय उत्कृष्ट प्रशासक!
अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केल्यावर मोदी म्हणाले, "2014 च्या निवडणुकीची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली, तेव्हा सर्वांत आधी मी रायगडावर आलो होतो. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर मी नतमस्तक झालो होतो. शिवरायांनी सुशासन आणि प्रशासनाचा एक नवा अध्यायच लिहिला होता. सतत संघर्षाचे वातावरण असतानाही शिवरायांनी सुशासनाची उत्तम परंपरा निर्माण केली आणि कायम राखली. जगाच्या पाठीवर असे उदाहरण दुर्मिळ आहे. इतिहासाच्या किंवा कलाकारांच्या नजरेतून शिवाजी महाराजांकडे पाहताना दरवेळी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची नव्याने ओळख होते. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे हे विविध पैलू आजही भारतीयांना प्रेरणा देत आहेत. शिवाजी महाराज म्हणजे केवळ तलवार, घोडा, युद्ध आणि मैदान यापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांचे संघटन कौशल्य, प्रशासन, सुशासनही तितकेच महत्त्वाचे आहे. शिवरायांचे जलव्यवस्थापन हे आजही भारतातील इंजिनिअरिंगच्य्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरते. राज्यातील मुद्रेवर दुसऱ्या कुणाचा अधिकार निर्माण झाला, तर शासन व्यवस्था कोसळून पडायला वेळ लागत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे स्वराज्याचे त्यांनी नवे चलन निर्माण केले. सागरी सुरक्षेचे महत्त्व आज जगाला पटले आहे; पण काही शतकांपूर्वीच शिवाजी महाराजांनी हे महत्त्व जाणले होते.''

पर्यटनासाठी आपल्याकडे समृद्ध वारसा!
राज्यासह देशभरातील गड-किल्ले हे पर्यटनासाठी समृद्ध वारसा आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 'पाश्‍चिमात्य देशांमध्ये ऐतिहासिक वास्तू हे पर्यटनासाठी मोठे आकर्षण असते. अशा वास्तू जगामध्ये देशाची एक वेगळी ओळख निर्माण करत असतात. आपल्या देशात अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण किल्ले आहेत. जगाला आकर्षण वाटेल, अशा वास्तू भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. पर्यटन हे जगातील सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र आहे आणि यासाठी भारताकडे असंख्य शक्तीस्थळे आहेत. 'साहसी पर्यटन करण्याची इच्छा असेल, तर आमचे हे किल्ले चढून दाखवा' असे पर्यटकांना सांगितले पाहिके. देशातील किल्ल्यांचे पर्यटन ही एक चळवळ बनली पाहिजे. शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण होईल, तेव्हा एका शूरवीराचे जगातील सर्वांत उंच स्मारक आपल्याकडे आहे, या विचाराने भारतीयांची मान ताठ होईल,' असेही मोदी म्हणाले.

विकासाचा मार्ग लवकर स्वीकारला असता, तर...!
विरोधकांवर, विशेषत: कॉंग्रेसवर टीका करण्याची संधीही पंतप्रधान मोदी यांनी साधली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध विकासकामांची यादीच सांगताना मोदी म्हणाले, "विकास हाच एकमेव मार्ग देशाने स्वातंत्र्यानंतर लगेचच स्वीकारला असता, तर आज देश एका वेगळ्याच उंचीवर असता. देशाची आणि देशातील प्रत्येकाची इच्छापूर्ती करण्यासाठी विकास हाच एक मार्ग आहे. त्यामुळे कोणत्याही धोरणाच्या केंद्रस्थानी विकासच असायला हवा. आम्ही सत्तेत आल्यानंतर पेन्शनसंदर्भातील एक अहवाल समोर आला होता. काही जणांना पेन्शन म्हणून सात रुपये, पंधरा रुपये अशी क्षुल्लक रक्कम मिळत होती. त्यामुळे कमीत कमी एक हजार रुपये पेन्शन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याचा सरकारी तिजोरीवर बोजा नक्कीच पडला; पण तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्या आयुष्यासाठी हा निर्णय घेतला. औषधे महाग होत असताना जेनेरिक औषधांवर आम्ही भर दिला. औषधावरून कुणाचेही शोषण होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्षांनीही गावा-खेड्यातील नागरिकांना 18 व्या शतकात जगायला भाग पाडणाऱ्यांना तुम्ही माफ कसे करू शकणार? असंख्य गावांमध्ये वीजेचा एक खांबही नव्हता. तिथे आता वीज पोचविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT