file photo
file photo 
महाराष्ट्र

पंतप्रधान पंडितजी त्या माऊलीची कैफीयत सुन्न होऊन ऐकतात आणि जन्माला येतो भूसंपादन कायदा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पुण्याकडे जाताना रस्ता वाकडा करुन सुप्याहून पारनेरकडं वळावंच लागतं. मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष मित्रवर्य दिनेश औटी उर्फ बापू यांच्या आत्मीय स्वागताला सामोरं जावंच लागतं. सुप्याकडून राळेगणकडे जाताना गावाच्या प्रवेशालाच दिनेशदादा यांचे घर आहे. घराला लागूनच त्यांची शेती आहे. शेतीवर त्यांचे विलक्षण प्रेम. पश्चिम महाराष्ट्रातला माणूस शेतीला कसा लगडून रहातो आणि शेतीचा किफायतशीरपणा कसा सुलाखून घेतो याचं हे उत्तम उदाहरण. औटी वहिनी नगरपंचायतच्या सदस्या. दिनेशदादा या भागात बापू नावानं परिचित. बापूची राजकारणात बऱ्यापैकी ऊठबस. राजकारणापेक्षाही समाजकारण आणि समाजकारणापेक्षा साहित्यात विशेष रुची. तसे ते स्वतः साहित्यिक वगैरे नाहीत. तरी त्यांची साहित्याविषयीची सखोलता आणि सलगी हेवा वाटावी अशी. 

पुलंपासून अलिकडच्या कल्पना दुधाळ, सचिन जगताप यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांच्या साहित्याचे संदर्भ ते सहजपणे देतात. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहालयात भारतीय संविधानापासून अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. साहित्यावरील प्रेमापोटी त्यांच्या संस्थेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील एका साहित्यिकाला पुरस्कार देऊन सन्मानित करतात. पहिल्या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे श्रोत्यांच्या रांगेत समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत हे चित्र पाहून आम्ही सुखावून गेलो. कौतिकराव ठाले पाटील, फ. मुं., रामदास फुटाणे, म्हात्रे, वाघ असं भलंमोठं गणगोत बापूनं जमवलंय. आजचा आघाडीचा कवी भरत दौंडकर हा तर बापूचा जीव की प्राण. साहित्यावर असलेल्या अतोनात प्रेमापोटी दुबई, सिंगापूर येथील विश्व मराठी साहित्य संमेलनाला स्वखर्चानं गेले. सध्या बापू महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पारनेर शाखेचे अध्यक्ष आहेत.

केंद्रीय मंत्री असल्यामुळे साहेबांभोवती भक्कम सुरक्षाकवच

यशवंराव चव्हाण हा बापूंचा आस्था विषय. भूमी संपादन कायद्याच्या संदर्भात यशवंतरावांनी जे कर्तृत्व दाखवलं त्याविषयीची बापूंनी सांगितलेली हकीकत सांप्रत राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. यशवंतरावजी देशाचे संरक्षणमंत्री असतानाची ही गोष्ट. सन १९७० आँक्टोबर महिन्यातील ही घटना. इंदापूर जवळच्या येडगाव धरणाचं होतं भूमिपूजन. या कार्यक्रमनिमित्त आले होते यशवंतरावजी. एका छोट्याशा गावातला कार्यक्रम. त्यांना ओवाळण्यासाठी गावातल्या सुवासिनी हातात कुंकवाचे करंडे घेऊन सज्ज होत्या. केंद्रीय मंत्री असल्यामुळे साहेबांभोवती भक्कम सुरक्षाकवच.

ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो' 

पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली. तिच्या पाठोपाठ आणखी गाड्यांचा ताफा आला. 'साहेब आले..साहेब आले.' एकच धांदल उडाली. गाड्या थांबल्या. यशवंतरावजी गाडीतून खाली उतरले. त्यांचं औक्षण करण्यासाठी काही सुवासिनी पुढे आल्या. त्या सुवासिनी साहेबांना ओवाळणार तेवढ्यात एक वयस्कर स्त्री वाऱ्याच्या वेगाने पुढे आली. तिने एका सुवासिनीच्या हातातील तबक हिसकावून घेतलं. ते भिर्रकन फेकून दिलं. ती महिला आणि सुवासिनीत झटापट झाली. झटापटीत सगळं कुंकू यशवंतरावांच्या सदऱ्यावर पडलं. सुरक्षा रक्षक त्वरेनं पुढे सरसावले. यशवंतरावांनी त्यांना खुणेनंच रोखलं. त्वेषाने आणि आक्रमकपणे वागणाऱ्या स्रीची चौकशी केली. तिच्या अशा वागण्याचे कारण विचारले. 'खरे आहे. ज्याचे पोट दुखते तोच ओवा खातो' असेच काहीतरी मनात पुटपुटले आणि "रागवू नकोस मावली. मी उद्या तुला भेटायला येतो." असे सांगून उद्घाटन न करता गाडीत बसून परत निघतात. 

पंतप्रधान पंडित नेहरुजींना या लोकांची कैफियत त्यांच्याच तोंडून ऐकायला लावतात

दिलेल्या शब्दप्रमाणे उद्या सकाळी कलेक्टरला घेऊन त्या स्त्रीच्या गावी पोहचतात. तिचं दुखणं काळजीपूर्वक ऐकून घेतात. त्या माऊलीची जमीन तलावात गेलेली. त्या धक्क्यानं मालक गेलेले. मुलाला पोरगी द्यायला कोणी तयार नाही. जमीन गेली. मोबलला नाही. मिळणार की नाही माहीत नाही. त्या माऊलीचं गाऱ्हाणं ऐकून यशवंतरावांचे डोळे पाणावतात. जिल्हाधिकाऱ्याला तिथल्या तिथे सूचना करतात. आठ दिवसात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीला यायला सांगतात. पंतप्रधान पंडित नेहरुजींना या लोकांची कैफियत त्यांच्याच तोंडून ऐकायला लावतात. पंडितजी सुन्न होऊन ऐकतात. आणि जन्माला येतो भूसंपादन कायदा. शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घ्यायची असेल तर आधी योग्य मोबदला द्या आणि मगच जमीन संपादन करा. देशाच्या इतिहासातील हा क्रांतीकारी निर्णय. हा इतिहास आहे.

यशवंतरावजींचे हे काम ऐतिहासिक आहे.

बापूनं सांगितलेली ही हकीकत. भूसंपादन कायद्यात यशवंतरावजींचं काम किती थोर आहे. याची प्रचिती आणणारी.आज शेतकऱ्याची जमीन ताब्यात घ्यायची असेल तर सगळे कायदेशीर सोपस्कार पाडावे लागतात. याचे श्रेय अर्थातच यशवंतरावजींकडे जाते. म्हणून आधुनिक महाराष्ट्राचा हा शिल्पकार थोरच. ही सविस्तर माहिती घेतली आहे नांदेडचे प्रसिध्द साहित्यीक प्रा. डाॅ. जगदीश कदम यांच्या फेसबुक पेजवरुन साभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT