Neelam Gorhe: शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय.
आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा बातम्या सुरु होत्या. मात्र थेटपणे त्यांचं नाव घेतलं जात नव्हतं. त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. शेवटी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
कोण आहेत नीलम गोऱ्हे?
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं होतं. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात.
शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडं आहे. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत.
पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएसएएमची पदवी त्यांनाी घेतली. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली.
रिपब्लिकन पक्षातून राजकीय सुरुवात
कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्तीसाठी त्या काम करत होत्या. 1987 पासून नीलम गोऱ्हे पूर्णवेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिपमध्ये प्रवेश केला. भारिपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही काम केलं होतं.
नीलम गोऱ्हे शिवसेनेत
रिपब्लिकन पक्षासोबत काम करताना त्यांनी महिलांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न यावर अनेक आंदोलनं केली. त्यांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासोबत काम केलं.
यातून पुढे त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आक्रमक नेतृत्व गुणामुळे त्यांनी शिवसेनेत स्वत:चे स्थान निर्माण केले. नीलम गोऱ्हे या चांगल्या संघटक असल्याने शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात वेगळा ठसा उमटवला.
राजकीय पदे
नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. त्यांनी 2005 मध्ये शिवसेना उपनेत्या म्हणून काम पाहिलं, 2007 मध्ये त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झाल्या त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम केलं. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून तीन वेळा त्यांनी काम केलं .
सामाजिक कार्य
पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर 1,000 च्यावर व्याख्याने दिली. हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन. 1993 लातूर व 2,000 गुजरात येथील भूकंपग्रस्तांना तसेच, 1993 मुंबई येथील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना मदतकार्य त्यांनी केलं.
महिला सबलीकरण समिती, पंचायत राज समिती, ग्रामीण विकास समितीसह अंदाज समिती, आश्वासन समिती, विशेष हक्क समिती, एड्स जनजागृती समिती, महिला सुरक्षेसाठीच्या आयटी समितीवरही त्यांनी काम केलं आहे.
त्याशिवाय दलित, महिलांवरील अत्याचार, आदिवासी विकास, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, दुर्बल, अपंग, निराधार महिला, मुस्लिम समाजाती तलाकसंबंधी प्रश्न आदी विविध सामाजिक विषयांवर त्यांनी काम केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.