voting awareness
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, माळशिरस, माढा, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व अक्कलकोट या ११ पंचायत समित्यांमधील १३६ गणांमध्ये मतदान होणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी देखील ७ फेब्रुवारीला मतदान आहे. या निमित्ताने शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांमध्ये १५३ महिला व ११८ पुरुष असे एकूण २७१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ११ पंचायत समितीमधील १३६ गणांमध्ये २३३ महिला आणि २५२ पुरुष उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण २४ लाख ५९ हजार २२७ मतदार असून त्यात ११ लाख ८२ हजार ८३ महिला आणि १२ लाख ७७ हजार ६१ पुरुष व ८३ तृतीयपंथी मतदार आहेत. मागच्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ६६.९६ टक्के मतदान झाले होते.
यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी त्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील प्रयत्न करण्यात आले आहेत. दरम्यान, मतदानाच्या दिवशी खासगी आस्थापना, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना काही तासांची सवलत द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जे उद्योजक, व्यावसायिक मतदारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतील आणि त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
शहरी भागातील दारू दुकाने सुरू, मतदानामुळे ग्रामीणमध्ये निर्बंध
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री तीन दिवस बंद राहणार असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. मतदानापूर्वीचा दिवस म्हणजेच ६ फेब्रुवारीला शहरी भाग (महापालिका, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्र) वगळता उर्वरित सर्व ठिकाणची दारू दुकाने बंद राहतील. मतदानाच्या दिवशी (७ फेब्रुवारी) देखील त्याच पद्धतीने मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यानंतर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून त्या दिवशी मतमोजणी संपेपर्यंत दारू दुकाने बंद राहतील, असेही आदेशात नमूद आहे.
मतदानासाठी पगारी सुट्टी, दोन तासांची सवलत
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याची सूचना कामगार आयुक्तांनी केली आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी दोन तासाची सवलत ही उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांच्यासाठी लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कामगारांकरिता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्या स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कामगारांना मतदानाकरिता सुट्टी अथवा दोन तासांची सवलत आस्थापना मालक देत नसल्यास कार्यालयाच्या दूरध्वनीवर (0217-2728401) संपर्क साधून तक्रार करावी, असे आवाहन अतिरिक्त सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.