तात्या लांडगे
सोलापूर : दरवर्षी ३६४ दिवसांत शाळा १२८ दिवस बंद असतात. त्यात ५२ रविवार आणि सार्वजनिक सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एकूण ७६ सुट्या असतात. सध्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्राकडे वाटचाल सुरु आहे. पुढच्या वर्षी १५ जून रोजी शाळा सुरु होतील. तत्पूर्वी, शाळांना जानेवारी ते जूनपर्यंत ७६ दिवस सुट्ट्या असणार आहेत.
वर्षातील किमान २२० दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे, असे अपेक्षित आहे. मात्र, प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र परीक्षा, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा, शिष्यवृत्तीसह अन्य परीक्षांमुळे किमान २५ दिवस जातात. त्यामुळे वर्षातील ३६४ दिवसांत १०० दिवस शाळा बंद तथा अध्यापन बंद असते.
दरम्यान, आता जानेवारी महिन्यात शाळांना १२ ते १५ जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीमुळे आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुटी असणार आहे. मार्च महिन्यात नऊ, एप्रिल महिन्यात सहा आणि १ मे ते १४ जूनपर्यंत शाळांना ४५ दिवस सुट्या असणार आहेत. दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून शाळा सुरु होतील. १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे नियोजन अद्याप कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...म्हणून एप्रिलअखेर अंतिम सत्र परीक्षा
विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता टिकून राहावी, अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापन व्हावे असा नियम आहे. मात्र, दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात सर्व शाळांची अंतिम सत्र परीक्षा संपवायची. त्यामुळे १५ ते १८ एप्रिलपासून विद्यार्थी शाळेत यायचे बंद व्हायचे. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गतवर्षीपासून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचे नियोजन करीत वेळापत्रक निश्चित केले. यंदाही त्यानुसार परीक्षा होतील.
जानेवारी ते जूनपर्यंतच्या सुट्या अशा...
जानेवारी : (१२ ते १५ जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीची सुटी, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन)
फेब्रुवारी : (१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती)
मार्च : (४ मार्च धूलिवंदन, २० मार्च गुढीपाडवा, २१ मार्च रमजान ईद, २७ मार्च रामनवमी, ३१ मार्च महावीर जयंती)
एप्रिल : (३ एप्रिल गुडफ्रायडे, १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)
मे व जून : (१ मे महाराष्ट्र दिन, १ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळा सुटी)