whats app call
तात्या लांडगे
सोलापूर : विजापूर रोडवरील आदित्य हॉटेलजवळ २० ऑक्टोबर रोजी तिघांनी व्यंकटेश बुधले या आयटी इंजिनिअरला मारहाण करून सोन्याची चेन हिसकावून नेली होती. त्याच्या मैत्रिणीच्याही गळ्यातील चेन हिसकावली होती. गुन्ह्यातील आरोपींबद्दल पोलिसांकडे कोणताही पुरावा नव्हता. त्याचवेळी रेकॉर्डवरील विकी दशरथ गायकवाड (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. सहा, सोलापूर) हा घटनेनंतर बेपत्ता असल्याची खबर लागली. त्याने आतापर्यंत २५ सीमकार्ड बदलले होते. तो मोबाइलवरील व्हॉट्सअपद्वारे गर्लफ्रेंडच्या संपर्कात होता. यावरून पोलिसांनी त्याला पकडले.
दिवाळीत नवीन दुचाकी घेतल्यावर व्यंकटेश मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता. रात्री पावणेनऊच्या सुमारास अचानक तिघांनी व्यंकटेशची दुचाकी अडविली. त्यांनी व्यंकटेश व त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली होती. त्यावेळी जीम करणाऱ्या व्यंकटेशने चोरट्यांना जोरदार प्रतिकार केला. त्यात विकीच्या नाकावर जखम झाली, डोळा काळानिळा झाला होता. व्यंकटेशच्या दुचाकीचा सायलेन्सर विकीला पोळला होता. व्यंकटेशने पोलिसांना सर्वकाही सांगितले होते. त्यानुसार संशयिताचे रेखाचित्र काढण्यात आले. पोलिस दवाखान्यात चौकशी करतील म्हणून जखमी विकी दवाखान्यात पण गेला नव्हता. गोपनीय खबऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत पोलिसांनी संशयितांबद्दल माहिती काढली. त्यात विकी व विनोद ऊर्फ रावण शावरप्पा गायकवाड (रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) हे घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी विकीचा शोध सुरू केला. विकीविरुद्ध पूर्वीचे १० तर विनोदविरुद्ध तीन गुन्हे दाखल होते.
२० दिवसांनी पोलिसांनी विकीला जेरबंद केले. त्यानंतर विनोद गायकवाडही सापडला. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कामगिरी केली. जगदीश ऊर्फ बारक्या संगटे (रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
दुसऱ्याच्याच सीमकार्डवरून विकीने उघडले व्हॉट्सॲप
सलगर वस्ती हद्दीतील ट्रॅक्टर चोरीत विकीला पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून पकडले होते. विकी सराईत गुन्हेगार असल्याने त्याने या गुन्ह्यात पोलिसांना आपण सापडू नये म्हणून शक्कल लढविली होती. वीटभट्टीवरील एका कामगाराच्या सीमकार्डवरून त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप उघडले. त्यावरून तो गर्लफ्रेंडला बोलायचा. पोलिसांना त्याचा सुगावा लागला आणि त्यावरून त्याला पकडले. त्यावेळी आपण हा गुन्ह्यात केलाच नाही, अशी त्याची ठाम भूमिका होती. हाताची जखम दुचाकीवरून पडल्यावर झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेऊन जखमेची खात्री केली. डॉक्टरांनी काहीतरी पोळल्याने जखम झाल्याचे सांगितले. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच विकीने गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.