पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर, बंदराच्या ठिकाणी विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी, वाढवण विरोधी बंदर संघर्ष समिती, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात केंद्र शासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली आणि ती वाढवण बंदराजवळ नेऊन दहन करण्यात आली.
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता. गावातील प्रत्येक नाक्यावर पोलीस तपासणी सुरू होती. वरोर नाका, वाढवण नाका आणि अन्य ठिकाणी पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणावर तैनात होता. मात्र, या कठोर बंदोबस्तातही नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात घोषणा देत, प्रतीकात्मक तिरडी बांधून प्रेतयात्रा काढली.
या आंदोलनाचे नेतृत्व डहाणूचे आमदार विनोद निकोले, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, ब्रायन लोबो, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केले. माजी आमदार कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला यांच्यासह हजारो ग्रामस्थांनी या आंदोलनात भाग घेतला. स्थानिक मच्छीमार, शेतकरी, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
डहाणू खाडीत सुमारे तीनशे मच्छीमार बोटी काळे फुगे आणि काळे झेंडे लावून बंदराच्या विरोधात जल आंदोलनात सहभागी झाल्या. मच्छीमारांनी हा प्रकल्प आपल्यासाठी घातक ठरेल असा इशारा दिला. या आंदोलनादरम्यान महिलांनीही घोषणाबाजी करत मोठा आवाज उठवला.
ग्रामस्थ आणि स्थानिक नेत्यांच्या मते, वाढवण बंदरामुळे स्थानिक मच्छीमार, टायमेकर, तसेच बागायतदारांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांना आपले जीवन विस्थापित करावे लागेल आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांनी या बंदराच्या विरोधात लढा उभारला आहे.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि जेएनपीटी यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून बंदराजवळ नेऊन तिचे दहन केले. त्यानंतर घोषणाबाजी करत बंदराच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. "आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्हाला वाढवण बंदर नको," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अशा परिस्थितीत, वाढवण बंदराच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारला या विरोधाचा सामना कसा करावा लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.